मंगळवेढा: मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये देण्याची घोषणा आणि इतर मागण्यांबाबत जिल्हाधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच राईनपाडा (जि. धुळे) येथे मृत्यूमुखी पडलेल्या पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नातलगांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
सकाळी सात वाजता पिंपळगाव येथून मृतदेह मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाडी येथे आणण्यात आले. अग्नू श्रीमंत इंगोले याचा मृतदेह मानेवाडी येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खवे येथे भारत शंकर माळवे, दादाराव शंकर भोसले आणि भारत शंकर भोसले यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजू रामा भोसले याचा मृतदेह गुंदवान (ता. इंडी जि. विजापूर) येथे ताब्यात देण्यात आला. मृतदेह ताब्यात देऊन पोलीस निघून गेल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. जिल्हाधिकाºयांनी स्वत: याबाबत लेखी आश्वासन द्यावे त्यानंतरच मृतदेह हलविले जातील, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यानंतर खवे गावातील जि. प. शाळेसमोर सभा झाली.
या सभेत मृतांना तातडीची दहा लाखांची मदत देण्यात यावी, यासंदर्भातील खटला जलदगती न्यायालयासमोर चालवावा, यासाठी उज्वल निकम यांच्याप्रमाणे सक्षम वकील देण्यात यावा, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
समाजाचे नेते मच्छिंद्र भोसले, भरतकुमार तांबिले, पोलीस उपअधीक्षक मच्छिंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक शिवनाथ शिंदे, निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप, भैरु भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आ. भारत भालके यांनी ही घटना संतापजनक असून आदिमानवाच्या काळातही अशा घटना घडल्या नसल्याचे सांगितले. नाथपंथी डवरी समाज हा शांतताप्रिय समाज असून, राईनपाडा येथे पाच जणांची झालेल्या हत्येने काळिमा फासण्याचे काम केल्याचे सांगितले. येत्या अधिवेशनात आपण स्थगन प्रस्तावाद्वारे या पाच जणांना न्याय मिळावा म्हणून मागणी करणार असल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घडलेली घटना निषेधार्ह असून, मृतांना शासकीय नियमाप्रमाणे मदत दिली जाईल असे सांगितले. त्याशिवाय नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या सर्व प्रश्नांसाठी बैठक बोलावू असेही सांगितले.
मात्र नातेवाईक लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह हलविले जाणार नसल्याचे सांगितले. वाढलेला संताप पाहून जिल्हाधिकाºयांनी लेखी पत्र दिल्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतदेहाची बिकट अवस्था- मंगळवेढा शहरात होणाºया आंदोलनाची स्थिती पाहून पोलिसांनी नगर, टेंभुर्णी, सांगोला मार्गे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेला दोन दिवस लोटल्याने मृतदेहाचा वास सुटल्याने त्या ठिकाणी थांबणे बिकट बनले होते. मृतदेह ताब्यात देताच नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. ही घटना करणाºयांना फाशी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचे सांगून पोलिसांवरही आपला राग व्यक्त केला. विशेषत: महिलांमध्ये संताप मोठ्या प्रमाणावर होता.
मंगळवेढ्यात बंदच्राईनपाडा येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी शहरातील मारुती मंदिरासमोर मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आ. भारत भालके, नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्यासह नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.