सोलापूर : मराठा आरक्षणासाठी विरोध करणाऱ्या केंद्राबरोबरच राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. हे अनोखे आंदोलन उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ गावात करण्यात आले.
उत्तर सोलापूर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या लढाईने तीव्र रूप धारण केले आहे. आमरण उपोषण, सामूहिक मुंडण, तिरडी मोर्चा, उपोषण व गावबंदीचा ज्वर गावोगावी पसरला आहे. गावागावांत रात्रंदिवस मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू झाली आहेत. सोमवारी बीबीदारफळ गावात प्रतिकात्मक पुतळयांची अंत्ययात्रा काढण्यात आली. याशिवाय कारंबा, कोंडी, वडाळा, नान्नज, मार्डी, कळमण, हिरज, तिर्हे आदी गावात मराठा समाज बांधव आक्रमक आंदोलन करीत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. त्याबाबतचा फलक गावाच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आला आहे.
सोमवारी सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनाचे नवे रूप धारण केले आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे. सोमवारी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळाला भेट देऊन मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित लवकरात लवकर आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे