माळेवाडी-बोरगाव येथील मागासवर्गीय समाजातील माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी रात्री २ वाजता निधन झाले. सकाळी त्यांच्यावर माळेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील खासगी शेतकऱ्याने त्यांच्या शेतातून अंत्ययात्रा नेण्यासाठी विरोध केला. याला कारण की काही महिन्यांपूर्वी मयताच्या नातेवाइकांनी त्यांच्याविरुद्ध दोन केसेस केल्या होत्या. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने त्यांच्या शेतातून जाण्यासाठी त्यांना मनाई केली. यानंतर मागासवर्गीय समाजातील लोकांनी तहसीलदार व पोलिसांना कळवले. त्यानंतर माळशिरसचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. मयताचे नातेवाईक व शेतकऱ्याबरोबर चर्चा केली. मात्र यातून काहीही मार्ग निघाला नसल्याने मयताच्या नातेवाइकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी केला.
सार्वजनिक ठिकाणी माळेवाडी-बोरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रेताचे दहन करून, सार्वजनिक उपद्रव करून प्रेताची विटंबना केली. म्हणून सात जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे. यामध्ये दशरथ आनंता साठे, मिथुन सुरेश साठे, अनिकेत दशरथ साठे, अभिषेक दशरथ साठे, किरण सुरेश साठे, सुरेश आनंता साठे, अरुण आनंता साठे (सर्व रा. माळेवाडी-बोरगाव, ता. माळशिरस) यांचा समावेश आहे.
------
उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह १३ जणांवर ॲट्रॉसिटी
सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधीला अडवणूक केल्याबद्दल विमल सुरेश साठे (रा. माळेवाडी-बोरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंच रवींद्र शहाजीराव पाटील, सदस्य प्रवीण मधुकर कुदळे, चंद्रकांत मारुती पांढरे, पोलीस पाटील गजेंद्र भीमराव पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयरम रामचंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छींद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे, अमोल दत्तात्रय कुदळे अशा १३ जणांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
-----
सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तहसीलदारांना आम्ही बोरगाव स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याचे सुचविले होते. तरीसुद्धा गावाला वेठीस धरून ग्रामपंचायतीसमोर दहन करून मयताची त्यांनी विटंबना केली आहे. ही गोष्ट अशोभनीय आहे.
- रवींद्र पाटील, उपसरपंच, माळेवाडी-बोरगाव
----
शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी रात्री २ वाजता मयत झालेल्या व्यक्तीचे सायंकाळी ६.३० पर्यंत दहन झाले नव्हते. स्मशानभूमीत जाण्यास मज्जाव केल्यामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाइकांना जवळपास १४ ते १५ तास वाट पाहावी लागली. शेवटी तहसीलदारांनी पर्याय दिला. परंतु पावसामुळे चिखलामधून स्मशानभूमीकडे जाता येईना. दुसरा पर्याय निघत नसल्यामुळे आमच्या नातेवाईक व सामाजिक संघटनांनी याचा निषेध म्हणून ग्रामपंचायतीसमोर मयताचा अंत्यविधी केला. आम्हाला न्याय मिळावा.
- विमल सुरेश साठे, मयताचे नातेवाईक
----