सतीश बागलपंढरपूर : विषमुक्त सेंद्रिय आणि दर्जेदार देशी केळीच्या उत्पन्नाचा ध्यास घेतलेल्या गादेगाव येथील पद्माकर बागल व त्यांच्या बंधूंनी नैसर्गिक संकटावर मात करून सलग दुसºया वर्षी भरघोस उत्पन्न घेतले आहे. मिरज, विजापूर, सांगली भागातील व्यापाºयांकडून १८ रुपये किलो दराने केळी खरेदी करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यात टिश्युकल्चर संकरित केळीचे उत्पन्न अधिक प्रमाणात घेतले जाते. देशी केळीचे उत्पन्न घेणाºयांचे प्रमाण कमी आहे. गादेगाव येथील पद्माकर बागल व त्यांचे बंधू चंद्रकांत बागल, भारत बागल यांनी आपल्या शेतात ६ एकर देशी केळीचे उत्पादन घेतले आहे. १८ रुपयाला एक रोप याप्रमाणे रोपांची खरेदी करून पाच बाय नऊ अंतरावर लागवड करण्यात आली. त्याआधी जमिनीची चांगली मशागत करून शेणखत टाकण्यात आले. सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला. यासाठी तीन लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक झाडाच्या बुंद्यालगत रिंग करून त्यामध्ये हे खत टाकण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक रोपाच्या मुळालगत सोडण्यात आली.
देशी केळीचे उत्पन्न मिळण्यास १२ महिन्यांचा कालावधी लागला. टिश्युकल्चर संकरित रोपांपेक्षा अधिकचे दोन महिने देशी केळीचे उत्पन्न सुरू होण्यासाठी लागतात. शिवाय देशी केळीच्या एका घडाचे वजन हे साधारण १२ ते १५ किलो इतके होते. यामुळे एकरी टनेजमध्ये देशी केळी ही तुलनेत कमी भरते.
या केळीला कर्नाटक, दक्षिण भारतात अधिक मागणी आहे. ही केळी खाण्यासाठी अधिक पौष्टिक आणि गोड आहे. नफा-तोटा याचा केवळ विचार न करता, सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार व्हावा, लोकांना विषमुक्त फळ मिळावे, यासाठी देशी केळीचे उत्पन्न घेतल्याचे पद्माकर बागल यांनी सांगितले. यातून एकरी ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची अडचण निर्माण झाली होती. मात्र, त्यावर मात करून केळीचे जतन केल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी बंधू चंद्रकांत बागल, भारत बागल तसेच पुतण्या श्रीकांत बागल व कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रिय फळांचा आग्रह धरायला हवा- ऊस पिकापेक्षा केळी तसेच द्राक्ष पिकातून अधिक उत्पन्न मिळू शकते. गेल्या दोन ते तीन वर्षांत ऊस कमी करून केळी व द्राक्ष पिकांवर भर दिला आहे. यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करण्यात येत आहे. सेंद्रिय फळे ही अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. प्रत्येकाने त्याचा आग्रह धरणे आवश्यक आहे, असं मत पद्माकर बागल यांनी व्यक्त केले.
पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करायला हवी. उद्योग म्हणून शेतीकडे पाहत असताना स्वत: वॉटर बॅँक शेतकºयांनी तयार करावी. यंदा उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा असल्याने त्याचा फायदा हा शेतकºयांना होणार आहे. - चंद्रकांत बागल, शेतकरी