सोलापूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सोलापूर दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते सोलापूर अक्कलकोट, सोलापूर ते सांगली आणि सोलापूर ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच यावेळी हत्तूर ते देगाव बायपास रस्त्याचेदेखील लोकार्पण होणार आहे.
शहरातील निम्मी जड वाहतूक कमी होण्याच्या दृष्टीने हत्तूर-केगाव बायपास रस्ता महत्त्वाचा आहे. बायपास रस्ता तयार झाला असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यानंतर सोलापूर अक्कलकोट, सोलापूर विजयपूर या महामार्गांच्या लोकार्पण कार्यक्रमासोबत हत्तूर केगाव बायपास रस्त्याचेही लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू होते. या आठवड्यात गडकरी हे सांगलीत होते. त्यांच्या हस्ते सांगली महामार्गाचे लोकार्पण झाले. सांगली कार्यक्रमानंतर सोलापूरला येणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिल्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे.
जड वाहतूक शहराच्या बाहेरून जाईल
पुढील पंधरा दिवसांत हत्तूर ते केगाव हा २१ किलोमीटरचा बायपास रस्ता लवकरच खुला हाेणार आहे. सोलापूर शहरातील जड वाहतूक कमी हाेण्याच्या दृष्टीने हत्तूर ते केगाव हा चारपदरी बायपास रस्ता महत्त्वाचा आहे. हा बायपास विजयपूर ते पुणे महामार्गाला थेट जोडतो. त्यामुळे दोन्ही महामार्गांवरून येणारी जड वाहतूक शहराच्या बाहेरून जाईल. त्यामुळे शहरावरील मोठा भार कमी होईल, तसेच अपघातही कमी होतील. त्यामुळे या बायपास रस्त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
............................