सोलापूर : जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून फायनान्सच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला आणि १३१ जणांना २ कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांना गंडा घातल्याची फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात नोंदली आहे. दोघांनी उलट आत्महत्येची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर २०११ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत घडला. शिवाजी लक्ष्मण आवार (वय- ३७, रा. ३३/३/४७ साईबाबा चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दिली.
रमेश अंबादास चिप्पा, सुजाता रमेश चिप्पा (रा. खुशी रेसीडेन्सी, गीतानगर, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सदरचा गुन्हा जून २०२४ पूर्वी घडला असल्याने भा. दं. वि. कलम ४२०, ४०६, ३४ सह एमपीआयडी ॲक्ट ३ प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीसह १३१ जणांनी श्री ओम साई फायनान्स, सोलापूर येथे नमूद दोघांनी जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून भिसीसाठी रक्कम गुंतवण्यास सांगितली. लोकांनी विश्वासाने रक्कम गुंतविली मात्र सदर रक्कमेचा दोघांनी फसवणूक केली. पैसे मागितले असता फिर्यादीला आत्महत्या करतो या प्रकारास सर्वजण जबाबदार रहाल म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे सपोनि सोनवणे करीत आहेत.