रवींद्र देशमुख । गाणगापूर : इथं काही नव्हतं हो पूर्वी. फक्त दत्तगुरूंचं अदृश्य अस्तित्व अन् संप्रदायातील भाविकांची भक्ती... आता सारंच पालटलंय. इथंच खड्ड्यात असलेलं बस स्टँड सुंदर वास्तूत रूपांतरित झालंय. रस्ते सिमेंटचे झालेत. लॉजेस उभारलीत... अन् बड्या बँकांची ‘एटीएम’ सुविधा मिळायला लागलीय... मालवणहून आलेले वयोवृद्ध दत्तभक्त श्रीपाद ताम्हणकर सांगत होते. खरोखरच दत्तनगरीत आता भीमा-अमरजासोबत विकासाच्या गंगेचा प्रवाह सर्वांनाच दिसत होता.
दत्त महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भीमा-अमरजा या पवित्र नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र गाणगापूरच्या विकासावर, या गावाच्या महात्म्यावर, तेथील भक्तीयुक्त वातावरणावर अन् साधकांच्या कठोर साधनेवर ‘लोकमत’ने दृष्टिक्षेप टाकला.
कोणत्याही शहर किंवा गावाबद्दलचं ‘फर्स्ट इंप्रेशन’ हे तेथील बस स्टँड किंवा रेल्वे स्थानकाच्या परिसरावरून ठरतं. गाणगापूरच्या बसस्थानक परिसराने प्रस्तुत प्रतिनिधीवर अगदी सकारात्मक इंप्रेशन टाकलं... बस स्टँडच्या स्वच्छ अन् सुंदर वास्तूने लक्ष वेधून घेतलं. तेथील स्टँडला कंपाउंड वॉल नव्हती. अगदी प्रवेशद्वारही नाही; पण कुणीही रिक्षाचालक किंवा अन्य वाहनधारक बेशिस्तीने आपलं वाहन स्टँडमध्ये घुसवत नव्हता किंवा पार्क करीत नव्हता. कर्नाटक एस.टी. महामंडळाने ‘स्थळ महात्म्य’ ओळखून अतिशय कल्पकतेने एस.टी. स्टँड दुमजली केलंय. दुसºया मजल्यावर साधारण पाच-सहा खोल्यांचं ‘भक्तनिवास’ बांधून दर्शनाला येणाºया भक्तांना उत्तम सुविधा निर्माण करून दिलीय.
गाणगापूर मूलत: कर्नाटकातील एक खेडंच. आता तिथली लोकसंख्या दहा हजारांपर्यंत पोहोचलीय. ग्रामपंचायतीमार्फत गावगाडा हाकला जातोय. पण गाणगापूरला आता गाव म्हणावं का? हा प्रश्न पडतो... कारण सर्वत्र सिमेंटचे रस्ते, सुलभ स्वच्छतागृहे, पथदिव्यांचा स्वच्छ प्रकाश... यामुळं गाणगापूरला पूर्वीसारखं खेडं मात्र आता म्हणता येणार नाही.
बसमधून एस.टी. स्टँडवर उतरल्यानंतर दत्तमाऊलींच्या मंदिरात जाणं एकदम सोपं. स्टँडच्या शेजारच्या गल्लीत गेलं की मंदिराचं नितांत सुंदर अन् भव्य महाद्वार लक्ष वेधून घेतं. स्टँडवरून सिमेंटच्या रस्त्याने चालतच मंदिरात जाणं सोयीचं जातं. कारण मंदिराच्या गल्लीतून मार्गस्थ होताना प्रसादाचं साहित्य खरेदी करता येतं.
मंदिराची आतली व्यवस्था अन् पद्धती पारंपरिकच आहे... पण तिथे आता नीटनेटकेपणा आलाय. जमिनीवर चांगल्या फरशा आहेत. प्रकाशाची व्यवस्था उत्तम आहे. मंदिर समितीचं कामकाज संगणकावर सुरू आहे. मंदिरात सर्वकाही उत्तम असलं तरी गाय आणि कुत्र्यांचा वावर असा मुक्तपणे कसा...? मंदिर समितीचे सचिव अजय पुजारी यांना विचारलं. ते म्हणाले, गोमाता आणि श्वान दत्त महाराजांसोबतच असायचे. त्यामुळे आम्ही त्यांना मंदिरात येण्यापासून रोखत नाही. भक्तांनाही त्यांचा कधीच त्रास नसतो. माधुकरीच्या वेळी ते येतात अन् काही खाऊन निघूनही जातात.
गाणगापूरला बहुतांश भाविक मुक्कामासाठीच येतात. तिथे आता निवासाची उत्तम व्यवस्था आहे. पूर्वी पुजारी मंडळींकडे राहणारे भाविक आता आपल्या सुविधांच्या गरजेनुसार मठ, आश्रम अथवा लॉजमध्ये राहू शकतात. गावात पंधरा लॉज आहेत. शिवाय धर्मशाळा आणि वीस मठ आहेत. गाणगापुरात राहण्यासाठी सध्या ५०० खोल्या उपलब्ध आहेत... देवस्थानचे सचिव अजय पुजारी सांगत होते. मुक्कामासाठी आलेले भाविक सकाळी संगमावर स्नान करूनच दर्शनासाठी मंदिरात येतात. केवळ दर्शनासाठी आलेले भक्त मंदिरात ‘श्रीं’चे दर्शन करून संगमावर दर्शनासाठी जातात. मंदिर ते संगम हा रस्ता डांबरी असून, तेथे जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे.
भव्य मूर्तींनी वेधले लक्ष!च्गाणगापुरातील विविध आश्रम आणि मठांनी आपला परिसर सुंदर ठेवला आहे. काही मठांमध्ये बगीचा विकसित केला आहे तर काही मठांबाहेर भव्य मूर्ती विकसित केल्या आहेत. मंदिरापासून संगमाकडे जाताना एका मठासमोर भव्य बजरंगबली, राम, अश्वारूढ शिवाजी महाराज आणि मागील बाजूला रामदास स्वामींच्या मूर्ती दिसून आल्या. तेथून जाणारे भाविक मूर्तींची छायाचित्रे घेताना दिसून आले.
आणखी सुधारणांची गरजच्गाणगापूर विकसित होत असले तरी तेथे आणखी सुधारणांची गरज आहे. अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था नसल्याने उघड्या गटारी दिसतात. अर्थात या गटारी ग्रामपंचायतीने व्यवस्थित सिमेंटने बांधल्या असल्या तरी डासांचा त्रास जाणवतो, असे भाविकांचे म्हणणे आहे. शिवाय रेल्वे प्रवासाची सुविधा उत्तम असली पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मुंबई-चेन्नई मार्गावरील सर्व गाड्या येथे थांबाव्यात, अशी मागणी पुजारींनी केली.
गाणगापुरात आज जयंतीच्गाणगापुरात दत्त जयंतीचा उत्सव २१ डिसेंबर रोजी असून, यानिमित्त मंदिरात पहाटे २.३० वा. काकड आरती, त्यानंतर निर्गुण पादुकांना केशरलेपन महापूजा, महाआरती होईल. सकाळी ७ वा. पंचामृत, तीर्थप्रसाद वाटप, दुपारी १२ वा. महामंगलारती आणि पाळणा, सायंकाळी पालखी सोहळा असे विधी होतील, अशी माहिती मुख्य पुजारी प्रसन्न पुजारी यांनी दिली.