सोलापूर : मोरया.. मोरया.., गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या ! असा जयघोष करत सोलापूर शहरात श्री गणेश मुर्तीच्या विसर्जनास सुरूवात झाली. छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर तलाव परिसरात असलेल्या विसर्जन कुंडात विसर्जन करण्यात येत आहे.
शनिवार 23 सप्टेंबर रोजी दुपारपासून श्री गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली. तलाव परिसरात हळू-हळू भाविकांची गर्दी वाढत आहे. संध्याकाळी आणखी भाविक येण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून विसर्जनासाठी चांगली तयारी केली आहे. भाविकांनी तलावात मूर्ती विसर्जन करु नये यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सर्व भाविकांना विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मातीच्या गणपतीचे विसर्जन घरच्या घरी करण्यात येत आहे. निर्माल्य एकत्रित करण्यासाठी स्वतंत्र कुंडाची सुविधा उपलब्ध केली आहे. भाविक निर्माल्य स्वतंत्र कुंडात जमा करुन मूर्ती विसर्जनासाठी विसर्जन कुंडाकडे जात आहेत. तलाव परिसरात विसर्जनापुर्वीची आरती करण्यात येत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये उत्साह दिसत आहे.