सोलापूर : शहरातील भक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करावे यासाठी जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश मूर्तींचे वॉर्डनिहाय संकलन करण्यासाठी विभागीय अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असल्याचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा गणेश भक्तांनी आपल्या घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. सार्वजनिक मंडळांनी जिथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली तिथेच मूर्ती विसर्जनाचा प्रयत्न करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. परंतु, काही भक्त दीड दिवसाच्या, पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तलावाच्या ठिकाणी जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अनंत चतुदर्शीच्या दिवशी वॉर्डात जाऊन गणेशमूर्तींचे संकलन करण्याचे नियोजन सुरू केले आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, नगरअभियंता संदीप कारंजे यांच्यासमवेत बैठक घेतली. पुढील चार दिवसांत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. नागरिकांनी आपल्या घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याचे फोटो मनपाकडे पाठवावेत. त्यासाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर करण्यासह इतर उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले.
काही भक्त आपल्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मनपाकडे देऊ इच्छित असतील तर प्रभागात कंटेनर ठेवण्यात यावेत. हे कंटेनर व्यवस्थितपणे विसर्जनस्थळी नेण्यात यावेत. यासंदर्भात योग्य ते नियोजन करावे, असेही आयुक्तांनी सुचवले.
तलाव परिसरात पोलीस बंदोबस्तधर्मवीर संभाजी तलाव, सिद्धेश्वर तलाव परिसरात गणेशमूर्तींचे विसर्जन करु नये यासाठी महापालिकेने फलक लावले आहेत. तरीही अनेक नागरिक या ठिकाणी विसर्जनासाठी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी संभाजी तलाव परिसरात काही नागरिकांवर कारवाई केली.
गणेश विसर्जनासंदर्भात महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त संयुक्तपणे निवेदन करणार आहेत. काही मंडळांना आपल्या भागात विसर्जनाची व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी मनपा मदत करेल. शासन नियमांचे उल्लंघन करुन कोणीही विसर्जन करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घ्यावी. -धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.