बार्शी : शहरातील श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या सहकार्याने रोडगा रोड येथे घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यात ४२१ जणांना लस देण्यात आली.
मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी सर्व व्यवस्थेबरोबरच जाण्या-येण्यासाठी रिक्षांची मोफत सोय करण्यात आली. लसीकरण मोहिमेसाठी बार्शी तालुका आरोग्य विभाग व राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग यांचे सहकार्य लाभले तर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी या शिबिरास भेट देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन केले.
या वेळी शिबिरात २८९ नागरिकांना लसीचा पहिला डोस व १३२ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यासाठी तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी लस उपलब्ध करून दिली. राष्ट्रीय नागरी आरोग्य कर्मचारी यांनी नागरिकांना लस देण्यासाठी कर्तव्य बजावले.
या शिबिरासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश यादव, संतोष जाधवर, अध्यक्ष अमोल हिंगमिरे, उपाध्यक्ष अमोल वायचळ, विनोद उमाटे, योगेश कारंजकर, नागेश काशीद, संजय मंडगे, राजाभाऊ पैकीकर, समथ बोटे, रोहित चंद्रशेखर, रोहन सुपेकर, धनंजय लिगाडे, रामचंद्र घोंगडे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शिबिरात महिलेस लस देताना व भेट देताना माजी मंत्री दिलीप सोपल, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश यादव, संतोष यादव आदी.