जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक गोष्टींचा प्रसार करण्याचे ते एक माध्यम बनले. गणेशोत्सवाने समाजातले विविध घटक एकत्र आणले. लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून भेदाभेद मिटवायचा प्रयत्न केला; पण परिस्थिती बदलली की, माणसाने बदलावे असे म्हणतात. इथे तर सगळेच बदलले. श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली आणि झगमटाला, भपकेपणा, दिखाऊपणाला प्रतिष्ठा आली. यामुळे कुठेतरी टिळकांच्या गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचा मूळ उद्देश हरवत गेला. आज उत्सव साजरा करताना लोकहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष व्हावे, यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.
सध्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात एक इव्हेंट म्हणून होऊ लागली. सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक नव्हे, तर तो राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आहे. माणूस जोडला तर राष्ट्र जोडेल, असे लोकमान्य टिळकांना वाटत असे; परंतु आज सोशल मीडिया, दूरचित्रवाहिन्यांनी माणसामाणसांतील संवाद संपवला आहे. उत्सवातील झगमगाटावर वाढत चाललेला नाहक खर्च आणि प्लास्टर ऑफ पॅरिस, तसेच थर्माकोलच्या अतिवापरामुळे निर्माण झालेला पर्यावरणाचा प्रश्न असेल आणि जागोजागी तर नवसाला पावणारे बाप्पा उभे राहिले आहेत. हे पाहिल्यावर टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवाचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.
स्वातंत्र्याअगोदर व नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक चांगले व्यासपीठ होते. अवयवदान, स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्याविरोध यासारखे विषय उत्सवाद्वारे समाजापुढे मांडावेत. वर्गणीच्या स्वरूपात लाखो रुपये गोळा करून मोठमोठी आरास, देखावे, झगमगाट करण्यापेक्षा समाजासाठी त्या पैशांचा विनियोग केल्यास जनतेलाच फायदाच होईल. वेगवेगळ्या देवस्थानांना करोडो रुपयांची देणगी दरवर्षी जमा होते. त्यातूनच सामाजिक बांधीलकी जपत पूरक्षेत्रात काम करता येईल. कोरोनाच्या काळात हॉस्पिटल, ऑक्सिजनची माणसाला किंमत कळली. ते निर्माण करू शकतो. गरिबांना मदत, वाचन केंद्र, अपंगांना मदत, विधायक कामांसाठी शालेय प्रोत्साहनात्मक बक्षीस वितरण, समाजातील गुणवंतांचा सत्कार, तसेच यातून स्थानिक सामुदायिक विवाह सोहळे, तरुणांना लघुउद्योगासाठी आर्थिक मदत, अशा पद्धतीची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारा गणेशोत्सव लोकमान्यांना खऱ्या अर्थाने अभिप्रेत असेल.
-प्रा. तात्यासाहेब काटकर
(लेखक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत.)