सोलापूर : कागदपत्रे स्कॅन करून एकाच ग्राहकाचे अनेक सिम कार्ड तयार करून इतरांना विकल्याप्रकरणी दुकानदारासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
गोपाल मुंदडा (रा.खाऊघर जनरल स्टोअर्स बलिदान चौक शिवगंगा रोड), राजेंद्र नागनाथ मल्लूरे (वय ३७ रा.भवानी पेठ घोंगडे वस्ती), स्वामी दुर्गा वरगंटी (रा.भवानी पेठ वैद्यवाडी), कमलकिशोर नंदकिशोर अट्टल (वय ३८ रा.गुरुदत्त चौक घोंगडे वस्ती), नागेश सुभाष येळमेली (वय ३२ रा.शाहीर वस्ती भवानी पेठ), महातय्या गुरय्या स्वामी (वय ३२ रा.जंगम वस्ती अक्कलकोट रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. शहरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांना दुसऱ्याच्या नावे असलेले सिम कार्ड विक्री होत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी खाउघर जनरल स्टोअर्स वर धाड टाकली. चौकशी केली असता गोपाल मुंधडा हा सिमकार्ड काढण्यासाठी आलेल्या लोकांचे कागदपत्र तीन ते चार वेळा स्कॅन करून घेऊन त्याआधारे बनावट सिमकार्ड काढून घेत असल्याचे निदर्शनास आले. हे सिम कार्ड तो अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कोणतेही कागदपत्र न घेता ३५० रुपयाला विकत असल्याचे समजले. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, विक्री करणाऱ्या दुकानदारासह बनावट सीमकार्ड खरेदी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त बापू बांगर साहेब पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विशेद्रसिंग बायस, पोलीस उपनिरीक्षक नागेश होटकर, हवालदार श्रीरंग कुलकर्णी, पोलीस नाईक सचिन गायकवाड, संतोष येळे, बाबु मंगरुळे, पोलीस शिपाई वसीम शेख, अर्जुन गायकवाड, अमोल कानडे, किरण माने, इब्राहिम शेख, चालक हवालदार राठोड यांनी पार पडली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आले सर्व सिम कार्ड हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. सिमकार्ड वापरणाऱ्यांना अटक केली जाणार आहे. याचा वापर कोणकोणत्या अवैद्य व्यवसायासाठी केला जातोय याचीही माहिती घेतली जात आहे.
बजरंग साळुंखे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.
नागरिकांनीही सावध राहावे : बापू बांगर
- नागरिकांनी नवीन सिमकार्ड घेताना खबरदारी घ्यावी, कागदपत्रे योग्य कारणासाठी स्कॅन होत आहेत का याची पडताळणी करावी. आपण कागदपत्रे कोणत्या कारणासाठी देत आहोत त्याचा उल्लेख कागदावर करावा असे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर यांनी केले आहे.
७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
- 0 सहा जणांकडून तेरा मोबाईल हँडसेट व दुसऱ्या ग्राहकाचे नावे असलेले १२ सिमकार्ड हस्तगत असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
- 0 सिमकार्ड खरेदी करण्यासाठी ग्राहक आला असता ओळखपत्र व रहिवासी पुराव्याचे कागदपत्र विशिष्ट मोबाइलमध्ये स्कॅन करून घेतले जात असे. त्याचा गैरवापर करून विविध कंपन्यांचे सिमकार्ड तयार करत असे. हे सिम कार्ड अवैध व्यवसाय करणाऱ्यांना विकले जाते.
- 0 खाऊघर जनरल स्टोअर्स मध्ये आयडिया, एअरटेल,जिओ, वोडाफोन सारख्या कंपन्यांचे सिम कार्ड विक्री केली जाते.