सोलापूर : प्रवासासाठी पैसे देऊन ई-पास मंजूर करणारी जिल्हाधिकारी कार्यालयातील टोळी उघड झाली आहे. यात एका कर्मचाºयासह सहा जणांची चौकशी झाली आहे.
लॉकडाऊन काळात आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासास वाहनांना परवाना देण्यासाठी कार्यालय सुरू करण्यात आले होते. येथे काम करण्यासाठी सेतूमधील काही कॉम्प्युटर आॅपरेटर्स यांनाही घेण्यात आले होते. दरम्यान, पासेस काढण्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. यामुळे जिल्हाधिकारी यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी ही टोळी उघडकीस आणली.
दरम्यान, हे ई-पासेस मंजूर देण्यासाठी एक आॅपरेटर जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. याचा एक मित्र पासेसच्या मंजुरीसाठी पैसे घेत होता आणि पैसे घेतल्यानंतर प्रवाशाचा टोकन नंबर त्या आॅपरेटरला देत होता. त्यानंतर त्या प्रवाशाला ई-पास लवकर मिळत होते. एका पाससाठी आॅपरेटरचा मित्र हा सहाशे रुपये घेत होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाºयाने दिली. अशा प्रकारे पास काढण्यासाठी पैसे घेणारी एक टोळीच कार्यरत होती. या प्रकरणातील पंढरपूर, मोहोळ, सलगरवस्ती येथून प्रत्येकी एकासह ६ जणांची शुक्रवारी चौकशी झाली.
ई-पास असे मोफत काढता येतातपोलिसांच्या वतीने देण्यात आलेल्या संकेतस्थळावर परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी अर्ज भरावा लागतो. ज्यांनी अर्ज भरला आहे. त्याला टोकन नंबर मिळते. यासाठी प्रवासाची परवानगी २४ तासात दिली जाते; पण काहीवेळा अर्ज संख्या जास्त आल्यास याला जास्त कालावधी लागतो; हा लागणारा कालावधी कमी करून लवकरात लवकर परवानगी मिळवून देण्यासाठी ही टोळी कार्यरत होती.
पाच जणांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यातील आॅपरेटरचा मित्र हा लोकांकडून पास काढण्यासाठी पैसे घेतो आणि टोकन आॅपरेटरकडे पाठवत असे; पण हे पास मंजूर करण्यासाठी हा आॅपरेटर पैसे घेत होता का नाही, याचा तपास सुरू आहे. यात आम्ही पोलिसांची मदत घेत आहोत जर आवश्यकता वाटल्यास यात आम्ही गुन्हा दाखल करू.- मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी