दत्तात्रय महादेव शेटे (रा. शिवाजीनगर, करमाळा) यांना अनोळखी साधूच्या वेशातील दोन व्यक्तींनी विश्वासात घेऊन पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचे आमिष दाखवले. साधूंवर विश्वास ठेवून शेटे यांनी साडेचार लाख रुपयांची रोकड हिरडगाव फाटा येथे साधूंजवळ सोपवली. पैसे दुप्पट होणार म्हणून शेटे यांनी मोठी लोखंडी पेटी बरोबर आणली, पैसे पेटीत ठेवण्याच्या बहाण्याने साधूंनी हातचलाखी करून पैसे लांबवले. शेटे यांनी दोन दिवस वाट पाहिल्यावर पैसे दुप्पट तर झालेच नाहीत. आत ठेवलेले पैसे गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेटे यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी खबऱ्यांमार्फत थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) येथील दोघा तोतया साधूंना अटक केली.
संतोष साहेबराव देवकर (वय ४५), अशोक फकीरा चव्हाण (वय ४५, दोघेही रा. जाधव वस्ती थेऊर, जि.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तपासात त्यांनी फसवणुकीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील लाटलेल्या रकमेपैकी संतोष देवकर याच्याकडून एक लाख ७० हजार रुपये व अशोक चव्हाण याच्याकडून दोन लाख पाच हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी दोन मोबाइल असा मिळून चार लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-----
..असा वापरायचा फंडा
आरोपींविरुद्ध यापूर्वीही जुन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे साधूच्या वेशात लोकांना औषधी वनस्पती, रुद्राक्ष विक्री करण्याचा व भिक्षा मागण्याचा बहाणा करून विश्वास संपादन करत जवळीक साधत विश्वास संपादन झाल्यावर आर्थिक अडचणीतले, कर्जबाजाऱ्यांची कौशल्याने माहिती घेऊन पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत जाळ्यात ओढत. त्यानंतर निर्जन ठिकाणी रात्रीचे वेळी पैसे घेऊन बोलावून फुलावर पैसे ठेवून हातावर तांदूळ देत. त्यानंतर डोळे मिटून प्रदक्षिणा घालण्यास सांगत. उद्या सकाळपर्यंत उघडू नका नाहीतर पैसे दुप्पट होणार नाहीत, अशी भीती दाखवत, अशी माहिती तपासात पुढे आली.