सोलापूर जिल्ह्यातील सात गुंडांची टोळी हद्दपार, ग्रामीण पोलीसांची कामगिरीसोलापूर : वेळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी करून दहशत माजवणाऱ्या सात जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी एक वर्षाकरिता सोलापूरसह इतर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. पिनू उत्तम येडगे (वय २१),दत्तात्रय उत्तम येडगे (वय २३), अजित उर्फ अजय शशिकांत जाधव (वय २१) दत्तात्रय अप्पासाहेब पवार (वय २४) दादा संभाजी जाधव (वय २१), पिनू विलास लोखंडे (वय २७, सर्व रा. वेळापूर,ता.माळशिरस ), योगेश अनिल शेटे (वय २०, रा. निमगाव, ता. माळशिरस) अशी हद्दपार केलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.या गुन्हेगारांविरुद्ध शिवीगाळ करणे, ठार मारण्याची धमकी देणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.सदर टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करुनही वर्तनात सुधारणा झाली नाही. सदर टोळीच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणे व सामाजिक स्वास्थ्य सुरळीत राहावे याकरिता वेळापूर पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.त्यानुसार पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना बीमोड करण्यासाठी सोलापूर जिल्हा, फलटण तालुका (जि.सातारा), मिरज तालुका (जि.सांगली), इंदापूर तालुका (जि.पुणे), या हद्दीतून एक वर्षासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांद्वारे हद्दपार करण्यात आले आहे. -------------------------जिल्ह्यात गुंडगिरी, खंडणी मागणाऱ्या, जनतेमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसह मटका, जुगार, दारुचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध ठोस प्रतिबंधात्मक कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे. - एस. वीरेश प्रभू, जिल्हा पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
सोलापूर जिल्ह्यातील सात गुंडांची टोळी हद्दपार, ग्रामीण पोलीसांची कामगिरी
By admin | Published: March 27, 2017 12:39 PM