सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी परिसरात एका हॉटेलशेजारी बोअरवेलमधून लपवून ठेवलेला १ लाख रुपयांचा १ किलो ३८ ग्रॅम गांजा पकडून असीफ अबुबकर तांबोळी (वय ३४), सिद्धेश्वर सुखदेव बनसोडे (वय ४०) या दोघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, लक्ष्मी दहिवडी परिसरात एक तरुण गांजा विक्री करीत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकारी नयोमी साटम यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस पथकासह २७ जुलै रोजी लक्ष्मी दहिवडी येथील एका हॉटेल परिसरात सापळा लावला. पोलिसांना दोन तरुण हॉटेलच्या पाठीमागे बसलेले दिसले.
साटम यांनी या ठिकाणी बसलेल्या दोघांना नाव व पत्ता विचारून तुम्ही येथे का बसला आहात? असे विचारले असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने पोलिस अधिकारी साटम यांनी हॉटेलची झडती घ्यावयाची असल्याचे सांगितले. यावेळी साटम यांची नजर हॉटेललगत असलेल्या बोअरवेलच्या पाइपकडे गेली. त्यांनी तिथे डोकावताच बोअरवेलमध्ये एक दोरी सोडल्याचे दिसले. पोलिसांचा संशय बळावत गेला अन् दोरी बाहेर ओढताच दोरीला बांधलेली एक पिवळ्या रंगाची कापडी पिशवी दिसून आली. त्या पिशवीचा उग्र वास आला. त्या पिशवीत गांजाची बिया, बोंडे, पानासह जवळपास २० हजार रुपये किमतीचा १ किलो ३८ ग्रॅम गांजा तसेच ८० हजारांचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला.