सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकार्डवरील गुन्हेगारांत शोधात पेट्रोलिंग करीत असताना तालुका पोलिसांच्या पथकास सोलापूरपासून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथे संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या एका आरोपीला पळून जाताना पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे २३ किलो ८५० ग्रॅम वजनाचा तब्बल ४ लाख ७७ हजार रुपयांचा गांजा हाती लागला. या प्रकरणी एक पकडला गेला तर दुसरा अगोदरच निसटला. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
आकाश राजकुमार सोनकडे, (वय २२, रा. सोनकडे वस्ती, होटगी, दक्षिण सोलापूर) असे अटक केेलेल्या आरोपीचे नाव असून, आकाश पंडित काळे (रा. कुंभारी रोड, वीटभट्टीजवळ, सोलापूर) हा पोलिसांचे पथक येण्यापूर्वीच निसटला. दोघांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. जप्त केलेल्या गांजासह २० हजार रुपयांचा मोबाइल, ६ लाख ५० हजारांची कार असा एकूण ११ लाख ४७ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. दोघांविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार करीत आहेत.
कारमध्ये सापडला उग्र वासाचा गांजाताब्यात घेतलेल्या तरुणाची विचारपूस करून त्याच्या ताब्यातील स्वीफ्ट कारची तपासणी केली. कारच्या डिक्कीत एका काळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे पोते बांधलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामध्ये हिरवट, काळसर, फुले व फळे आलेला शेंड असलेला उग्र वास येणारा ओलसर गांजा दिसून आला. त्याचे वजन २३ किलो ८५० ग्रॅम भरले. त्याचे बाजारमूल्य ४ लाख ७७ हजार असून, हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिस पोहोचण्यापूर्वीच एक निसटलागांजासह तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र त्याच्यासोबत असलेली दुसरी व्यक्ती पोलिस पोचण्यापूर्वीच निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.