सोलापूर : कोणत्याही मुलाचा पहिला वाढदिवस हा विशेष असतो. मुलांपेक्षा पालकांना त्याचे जास्त कौतुक असते. पण एका वर्षाच्या चिमुकलीला कोरोना झाल्याने हे शक्य नव्हते. त्यातच डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन कोरोना वॉर्डामध्ये दोघांचा वाढदिवस साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कोरोना वॉर्ड आहे. येथे कोरोना आजार झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतात. या रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. गुरुवार १४ मे रोजी एक वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस होता. तिच्या वडिलांना तिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायचा होता. पण तिला कोरोनाची लागण झाल्याने हे शक्य नव्हते.
वडिलांनी डॉक्टरांकडे आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे. कोणत्याही पालकांना आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस साजरा करणे हा एकप्रकारे मोठा उत्सव असतो. हा उत्सव साजरा करण्याची त्यांना परवानगी मागितली. पण डॉक्टरांनी ही परवानगी नाकारली. कोरोना वॉर्डातून विषाणूचा प्रसार होऊ शकतो म्हणून परवानगी देता येत नाही; मात्र आम्ही डॉक्टर आणि इतर कर्मचारी मिळून वाढदिवस साजरा करु असे आश्वासन चिमुकलीच्या वडिलांना देण्यात आले.
ब्रदरने आणला केक- वडील आणि इतर नातेवाईक नाही पण डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी तिचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. कोरोना वॉर्डात काम करणाºया ब्रदरला केक बनवता येत होता. त्याने केक बनवून आणला. डॉक्टर आणि इतरांची परवानगी घेऊन वाढदिवस साजरा करण्याचे ठरले. कोरोना वॉर्डाच्या गच्चीवर जेवणाची सोय करण्यात येते. तिथेच वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. तेव्हा आणखी एका १० वर्षाच्या मुलाचा वाढदिवस असल्याचे कळाल्याने दोघांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या मुलांच्या वाढदिवसामुळे रुग्णालयातील वातावरण उत्साही झाले होते.
मुलीच्या वडिलांनी वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. ते शक्य नव्हते; आम्हीच वाढदिवस साजरा केला. हा छोटासा कार्यक्रम मोबाईलमध्ये चित्रीत करून त्याचे फोटो व व्हिडीओ तिच्या वडिलांना पाठविले.- डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय.