सोलापूर - कोरोनाच्या कठीण काळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना विविध कारणावरुन घरचा रस्ता दाखविण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संवेदनशीलता हरविल्याचा आरोप कामगार संघटना करत आहेत.
महापालिकेच्या झोन कार्यालयातील ४००हून अधिक कंत्राटी कामगारांची सेवा दोन महिन्यांपूर्वी समाप्त करण्यात आली. कायम कामगार काम करत नाहीत, केवळ कंत्राटी माणसे काम करतात. त्यातून आस्थापना खर्च वाढत असल्याचा निष्कर्ष आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढला. कामगार नेते अशोक जानराव म्हणाले, कोरोनाच्या काळात महापालिकेत अधिकारीच नव्हते. कायम आणि कंत्राटी कामगार जीवाची पर्वा न करता, रस्त्यावर काम करत होता. त्यांच्यामुळे शहरावरील संकट दूर झाले. महापालिकेचे उत्पन्न कमी झाल्याचे कारण दाखवून कामगारांना कामावरुन कमी केले जात आहे. वास्तविक पालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. त्यांनी आपले काम न करता कामगारांचे घर उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे. प्रशासनाची हीच रित राहिली तर संकटाच्या काळात कुणीही मदतीला येणार नाही.
आयुक्त महापौरांचेही ऐकत नाहीत : अमोल शिंदे
विरोधी पक्षनेते अमोल शिंदे म्हणाले, काम असमाधानकारक असल्याचे सांगून ५१ संगणक चालकांची सेवा समाप्त केली. यातील अनेक सेवकांनी कोरोनाच्या काळात काम केले. आज महापालिकेला हे लोक नकोसे का झाले. संगणक चालकांना कामावरून काढू नका, असे सांगण्यासाठी आम्ही सर्व गटनेते आयुक्तांना भेटलो. परवा दोन महिला ऑपरेटर्सना अचानक काढून टाकण्यात आले. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दोन्ही ऑपरेटर्सना आणखी एक संधी द्यावी, असे आयुक्तांना सांगितले. तरीही संधी दिली गेली नाही. हे प्रकार कामगारांच्या आणि शहराच्या हिताचे नाहीत.