साेलापूर : नवरात्राेत्सव काळात शहरात गरबा, दांडिया कार्यक्रमांना बंदी असेल. शहरातील सर्व मंदिरे गुरुवारपासून भाविकांसाठी खुली हाेत आहेत. रुपाभवानी मातेसह सहा मंदिरांत देवीचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करुन दर्शन पास घेणे आवश्यक असेल. रुपाभवानी मंदिराच्या वेबसाईटवरच इतर सहा मंदिरातील दर्शनाचे बुकिंग करता येईल, असे महापालिका आणि पाेलिसांकडून जाहीर करण्यात आले.
राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे गुरुवारपासून खुली करण्याचे आदेश दिले आहेत. नवरात्राेत्सवात शहरातील सहा मंदिरांमध्ये गर्दी हाेते. या मंदिरांमध्ये ऑनलाइन बुकिंग करुनच दर्शन देण्यात यावे असा निर्णय महापालिका आणि पाेलीस प्रशासनाने घेतला. मंदिरांच्या विश्वस्तांना हा निर्णय कळविण्यात आला. पाेलिसांनी आणि रुपाभवानी मंदिराच्या विश्वस्तांनी ऑनलाइन बुकिंगसाठी एक वेबसाईट तयार केली. या वेबसाईटवर इतर मंदिरांतील दर्शनाचे बुकिंग करण्याची साेय देण्यात येईल. शहरातील अनेक गाेरगरीब लाेक रुपाभवानी मातेसह इतर मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. या भाविकांना ऑनलाइन बुकिंग करण्यात माेठ्या अडचणी येणार आहेत.
---
शहरातील सर्व मंदिरे गुरुवारपासून खुली हाेतील. सहा मंदिरांमध्ये नवरात्राेत्सवात माेठी गर्दी हाेत असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. पाेलिसांकडून या मंदिरांच्या विश्वस्तांना ऑनलाइन बुकिंगचे नियाेजन करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या मंदिरांमध्ये गर्दी नसते तिथे यापूर्वीच्या पद्धतीनुसार दर्शन घेता येईल. दाेन भाविकांमध्ये अंतर असावे. मंदिरात थर्मल स्क्रिनिंग, मास्क वापर करणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आदी आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही अपेक्षित आहे.
- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.
---
दर्शन पास काढण्यासाठीचे नियम
दर्शन पास काढण्यासाठी भाविकांना लसीचे दाेन डाेस घेतलेले असणे अनिवार्य असेल. दर्शनास येताना लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र आवश्यक. भाविकांनी फाॅर्म भरताना देवस्थान, दर्शनाची तारीख, दर्शनाची वेळ निवडावी.माहिती पूर्ण भरुन झाल्यावर दर्शन पासचा स्क्रीनशाॅट काढून घ्यावा. दर्शनास आल्यानंतर स्क्रीन शाॅट दाखविणे आवश्यक. दाेन दिवस अगाेदर दर्शन पास काढणे आवश्यक.
- वैशाली कडूकर, पाेलीस उपायुक्त.
--------
देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुकीला बंदी
- गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयाेजित करु नयेत.
- सार्वजनिक मंडळांनी उत्सवासाठी परवानगी घ्यावी. साध्या पद्धतीने उत्सव करावा.
- देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, वेबसाईट व साेशल मीडियाद्वारे उपलब्ध करुन द्यावी.
- मंडपात एकाचवेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी.
- देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
रावण दहनाला परवानगी, सीमाेल्लंघनाचे काय?
दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम करण्यास परवानगी असेल. मात्र आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील याची दक्षता घ्यावी. प्रेक्षक बाेलावू नयेत. पार्क चाैक परिसरातील सीमाेल्लंघन कार्यक्रमाबाबत मात्र महापालिकेने स्पष्टीकरण दिलेले नाही.
---
या मंदिरात दर्शनासाठी करावे लागेल बुकिंग
रुपाभवानी देवस्थान, श्री शिवगंगा मंदिर देवस्थान, श्री विश्वब्राह्मण समाज कालिका मंदिर, श्री हिंगुलांबिका मंदिर, कालिका मंदिर पाच्छापेठ, शिवलाड तेली समाज शुक्रवार पेठ. भाविकांनी http://shrirupabhavanidevasthan.com/ येथे बुकिंग करावे.