सोलापूर: शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अक्कलकोट, माळशिरस तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हवामान विभागाने यापूर्वीच अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. गेल्या तीन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये मात्र या अवकाळी पावसामुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री सुमारास चपळगाव, बोरेगाव, हन्नुर नागणसूर, किणी,वागदरी, बोरोटी, पानमंगरूळ, तडवळ, चुंगी, अक्कलकोट परिसर यासह विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारा व विजेच्या कडकडाटामुळे वातावरणात बदल दिसून आला. तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. किणी भागात गारांचा पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बोरोटी येथील सुमारे दोनशे एकर पपई जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दोन दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
माळशिरस तालुक्यात वीस मिनिट गारपीटमाळशिरस तालुक्यातील पश्चिम भागामधील रेडे, मांडकी, कन्हेर, इस्लामपूर, भांब, सरगरवाडी, गोरडवाडी या गावात १५ ते २० मिनिटे गारपीट झाली. गहू, ज्वारी द्राक्ष पिकाचे नुकसान झाले असून प्रभारी तहसीलदारांचा पथकासह पाहणी दौरा सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. नातेपुते, शिंदेवाडी परिसरातील गहू जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे