सोलापूर : सोन्या-रुप्याच्या पावलांनी गौरींचे आज दुपारी घरोघरी आगमन होत आहे. पारंपरिक स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या दागिन्यांबरोबरच गौराईला सजविण्यासाठी मुंबई आणि कोल्हापुरातूनही दागिने सोलापूरच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. बाजूबंद, कंबरपट्टा, मोहनमाळ, कोल्हापुरी ठुशी, चांदीचे मुखवटे खरेदीसाठी लगबग आहे.
लॉकडाऊन काळात परराज्यात आपल्या गावी गेलेले बंगाली कारागीर लग्नसराई आणि सण-उत्सव पाहता काही कारागीर सोलापुरात पुन्हा दाखल झाले. त्यांनी पुन्हा कलाकुसरीचे काम सुरू केले. लक्ष्मीला सजविण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या चांदीचे आणि सोन्याचे दागिने लागतात. स्थानिक कारागीर आणि बंगाली कारागिरांच्या मदतीने येथील सराफ व्यावसायिकांनी काही प्रमाणात दागिने बनवून घेतले आहेत. तर मुंबई आणि कोल्हापूरमधून काही दागिने येथील बाजारपेठेत दाखल झाले आहेत.
चांदीच्या ताट-वाटीसह सोन्याच्या पाण्याने पॉलिश केलेले दागिनेही सोलापूरकरांना भुरळ घालत आहेत. काही लोकांनी पंधरा दिवसांपूर्वी हे दागिने बनवायला दिले असल्याने मागणीनुसार काही दागिने कोल्हापूर आणि मुंबईतून दाखल झाले आहेत.हे दागिने दाखवण्यासाठी दुकानदारांनी कोरोनापासून काळजी घेतली आहे. ग्राहकांच्या हातात ग्लोज घालून ते दाखवले जात आहेत. तसेच ग्राहकांना निर्जंतुकीकरण करून दुकानात प्रवेश दिला जात आहे.
अँटिकच्या दागिन्यांनाही पसंती...नेहमीप्रमाणे चांदीचे मुखवटे, जिरेटोपसह अँटिक दागिने उपलब्ध झाले आहेत. सोन्यामध्ये बांगड्या, पाटल्या, बोरमाळ, अंगठी, ठुशी, मोहनमाळ, नेकलेस, राणीहार, चपलाहार, बोरमाळ, कोल्हापुरी साज, अंबाडा, बुचडा, बाजूबंद, शॉर्ट आणि लाँग टर्मचे दागिने पाहायला मिळत आहेत. सोन्याचे पॉलिश केलेले काही दागिने उपलब्ध आहेत.
लॉकडाऊन काळातही गौरीसाठी दागिने बनवून घेण्याकडे ग्राहकांचा कल पाहायला मिळतोय. काही लोकांनी या काळात आॅनलाईन दागिनेही मागवले आहेत. दरातील चढ-उताराचा या दागिन्यांवर परिणाम झालेला नाही. कोल्हापूर आणि मुंबईच्या दागिन्यांची चौकशी अधिक आहे.- पराग गांधी सराफ व्यावसायिक