सोलापूर : येत्या शुक्रवारी गणेशोत्सवास प्रारंभ होणार असून, पहाटे साडेचार ते दुपारी दीडपर्यंत घराघरांमध्ये श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रविवारी गौरींचे आगमन होणार असून, सोमवारी पूजा आणि मंगळवारी गौरी विसर्जन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. पहाटेपासून दुपारपर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टीकरण इ. वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत असेही पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते.
-----------
..असे आहेत यंदाचे गणेशोत्सव व गाैरी उत्सवातील महत्त्वाचे दिवस
- १० सप्टेंबर २०२१ शुक्रवार - श्रीगणेश चतुर्थी
या दिवशी पहाटे ४.५० पासून दुपारी १.५० पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
- १२ सप्टेंबर २०२१ रविवार - गौरी आवाहन
सकाळी ९.५० नंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
- १३ सप्टेंबर २०२१ सोमवार - गौरी पूजन
- १४ सप्टेंबर २०२१, मंगळवार - गौरी विसर्जन
सकाळी ७.०५ नंतर गौरी विसर्जन करावे. मंगळवार असला तरीही गौरी विसर्जन परंपरेप्रमाणेच करावे.
- १९ सप्टेंबर २०२१ रविवार - अनंत चतुर्दशी
---------
दरवर्षी उत्सवासाठी अनेकजण आपल्या गावी जात असतात. यावर्षी त्यांना गावी जाणे शक्य नसल्यास त्यांनी राहत्या घरी गणेशोत्सव करून आपली गणेश पूजनाची परंपरा अखंडित ठेवावी. यावर्षी कोरोना संकटामुळे ज्याप्रमाणे अनेक बदल आपण अंगीकारले त्याप्रमाणे गणेश उत्सवातसुद्धा आपणास बदल करावा लागेल, तेव्हा अशा प्रकारे श्री गणेशाचे पूजन करून त्या विघ्नहर्त्याकडे कोरोनाचे संकट जावे, अशी प्रार्थना करू या.
- मोहन दाते,
पंचांगकर्ते, सोलापूर