विलास जळकोटकर / सोलापूर: खोदकाम करताना अर्धा किलो सोनं असलेल्या हंडा सापडला आहे. तो विक्री करायची आहे अशी बतावणी करुन त्या बदल्यात दोन लाख रुपये स्क्रॅप दुकानदारांकडून घेतले आणि पोबारा केला. सराफाकडे ते दागिने खोटे असल्याचे निदर्शनास आल्याने फसवणूक झाल्याची तक्रार दुकानदार सुभाष विठ्ठल ननवरे (वय ५४, रा. माशाळ.वस्ती, विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालय परिसरात जय संतोषी माॅ या नावाचे फिर्यादीचे स्क्रॅपचे दुकान आहे. २५ जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास एक अनोळखी तरुण त्यांच्या दुकानात आला. त्याने मजूर म्हणून काम करत असल्याचे सांगून स्क्रॅप विकायचे आहे असे फिर्यादीला सांगितले. त्याने फिर्यादीचा मोबाईल नंबर घेऊन 2७ जानेवारी रोजी त्यावर फोन केला. त्यानंतर तो मजूर आणि आणखी एक असे दोघेजण फिर्यादीच्या दुकानात आले. त्यांनी आम्ही राजस्थानतून आलो आहोत, येथे मजूर म्हणून खोदाईचे काम करतो असे सांगितले. जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरात खोदाईचे काम करीत असताना हंडा सापडला असून, त्यात अर्धा किलो सोने असल्याचे फिर्यादीस सांगितले.
त्यानंतर फिर्यादीला 2८ जानजेवारी रोजी सायंकाळी त्या तरुणाचा फोन आला. त्याने तातडीने दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी दोन लाख रुपये घेऊन ते तरुण थांबलेले ठिकाणी गेले. तेथे त्यांनी सोने असलेली पिशवी फिर्यादीच्या हातात दिली आणि पैसे घेऊन तेथून निघून गेले. या प्रकरणी अधिक तपास फौजदार गायकवाड करीत आहेत.सराफाकडे गेले अन् सोने खोटे निघालेदुसऱ्या दिवशी फिर्यादीने सराफाकडे जाऊन सोने तपासले असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेऊन दोघांकडन आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिल्याने गुन्हा नोंदवला.