आप्पासाहेब पाटील
सोलापूर :सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर महानगरपालिकेच्या ४७ एकर जागेत होत असलेल्या इको पार्कच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे. मार्चनंतर हे इको पार्क सोलापूरकरांसाठी खुले होणार असून या पार्कमध्ये सायकल ट्रॅक, गझिबो, रॉक गार्डन, इंटरन्स प्लाझा, रॉ गार्डन, प्रसाधनगृह, ओपन गार्डन असणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात सोलापूरकरांचा या पार्कच्या माध्यमातून थंडावा मिळणार आहे.
सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली - उगले यांनी केगाव नजीकच्या ४७ एकरावर होत असलेल्या ईको पार्कच्या कामाची गुरुवारी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अन्य महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. केगावजवळ ४७ एकर जागेवर पिकनिक पॉइंट म्हणजेच इको पार्क विकसित होत आहे. या ठिकाणी डीपीडीसीतून १ कोटी ४५ लाख रुपयाचा निधी तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कारकिर्दीत मंजूर झाला होता. या निधीतून विविध कामे सुरू आहेत. मार्चअखेर पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
केगावजवळच्या ४७ एकर इको पार्क (पिकनिक पॉइंट) होत आहे. यश कन्स्ट्रक्शन यांच्याकडे या कामाचा मक्ता देण्यात आला आहे. अद्यापपर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील हे काम पूर्ण होणार आहे. यामुळे त्यानंतर इको पार्क येथे उन्हाळ्यात सोलापूरकरांसाठी खुले होईल. - संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त, सोलापूर महापालिका
हिरवाईने नटला परिसर...
४७ एकरावरील मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. कंपाउंड वॉल, तारेचे कुंपणही करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ही झाडे सहा फूटपर्यंत वाढली आहेत. हिरवाईने नटलेला हा परिसर आता सर्वांना आल्हादायक ठरणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"