सोलापूर : मागील काही दिवसांपासून विजेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ज्या ग्राहकांनी विजेचे बिल भरले नाही, अशा ग्राहकांची वीज कापली जात आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन काळातील वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने डफरीन चौकातील मुलींच्या आयटीआय कॉलेजचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे सात दिवसांपासून महाविद्यालय अंधारात आहे. जनरेटर मागवून विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागत आहे.
जिल्ह्यात मुलींसाठी एकमेव औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेचे अनुदान न आल्यामुळे लॉकडाऊन काळातील ४ लाख ६५ हजार रुपयांचे विजेचे बिल संस्थेने भरलेले नाही. यामुळे महावितरणने संस्थेला नोटीस पाठवली. पण नोटीस पाठवूनही संस्थेने बिल न भरल्यामुळे महावितरणने २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी वीज कापली. यामुळे महाविद्यालय अंधारमय झाले आहे. यामुळे परीक्षेच्या दिवशी तेथील कर्मचाऱ्यांनी जनरेटर मागवून परीक्षा घेतली. उर्वरित परीक्षेसाठी विजापूर रोडवरील मुलांच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना पाठवून तेथून परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
साहेब, परीक्षा संपल्यावर वीज कट करा
वीज महामंडळाने नोटीस देऊनही बिल न भरल्यामुळे २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संस्थेचे वीज कट करण्यासाठी संस्थेत आले. तेव्हा विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली. ‘साहेब, परीक्षा सुरू आहेत तुम्ही आत जाऊन पाहा. सायंकाळी ४ वाजता परीक्षा संपतील तोपर्यंत थांबा. नाहीतर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल’, अशी विनवणी केली.
आम्हाला महाविद्यालयांची वीज कापली हे माहीत नव्हते. पण, ज्या दिवशी जनरेटरच्या मदतीने आम्हाला परीक्षा द्यावी लागली, तेव्हा याचा अंदाज आला. वीज नसल्यामुळे आम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेच्यावेळी अडचणी येत आहेत.
- ऐश्वर्या जाधव, लक्ष्मी पाटील