उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर अतिक्रमण करून १४ दुकाने थाटली आहेत. यामुळे जिल्हा परिषद शाळेचा रस्ताच बंद झाला आहे. याबाबत विस्तार अधिकारी गोदावरी राठोड यांनी अहवाल दिल्यानंतर पुढील कारवाईचे आदेश निघाले आहेत. शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी मुख्याध्यापकांना तसेच गटविकास अधिकारी डाॅ. जस्मीन शेख यांनी प्रशासक व ग्रामसेवकाला पत्र दिले आहे. या पत्रात अतिक्रमण करून १४ दुकाने थाटल्याने शाळेत प्रवेश बंद झाल्याचे म्हटले आहे. यामुळे हे अतिक्रमण काढून रस्ता सुरू करावा त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, असे पत्रात म्हटले आहे.
जागा जिल्हा परिषद मालकीची..
शिक्षणाधिकारी राठोड यांनी दिलेल्या पत्रात, ही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. आपण मुख्याध्यापक असल्याने झालेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी, असे म्हटले आहे.
----