सोलापूर : खासगी ॲपच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्यांची तिकिटं मिळतात; मात्र नियोजनाचा अभाव असल्याने जिथं जायचं आहे त्या मार्गावर गाड्याच नसतात. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकावर आलेले प्रवासी आणि वाहक-चालकांमध्ये विनाकारण वाद होतानाचे चित्रही पाहावयास मिळते.
प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी प्रशासनाकडून बुकिंग करून प्रवास करण्याची सोय आहे़ याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. नावाजलेल्या कंपन्यांचे अॅप असल्यामुळे प्रवासीही त्या अॅपचा सर्रासपणे वापर करतात़ या अॅपमध्ये गाड्यांच्या फेऱ्यांची माहिती अपडेट नसल्यामुळे एस. टी. महामंडळाकडून बंद करण्यात आलेल्या फेऱ्यांचेही बुकिंग दाखवले जाते. यामुळे प्रवासी कोणताही विचार न करता तिकीट बुक करतो़ सोबतच अॅपमध्ये दाखवलेल्या वेळेनुसार गाड्यांचे तिकिट बुकिंग केल्यानंतर काही मार्गावर दिलेल्या वेळेत गाड्या उपलब्ध नसतात़ ही बाब प्रवाशांना एसटी स्थानकात गेल्यानंतर समजत़े़ काही वेळा एकाच मार्गावरच्या दोन गाड्या वेगवेगळ्या आगाराच्या असतात. पण, कोणत्या गाडीत प्रवाशांचे बुकिंग असते हे प्रवाशांना लक्षात न आल्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते़
प्रवाशांचा वेळही जातो...
लॉकडाऊननंतर एसटी महामंडळाने प्रवासी मिळत नसल्याने काही मार्गांवरील गाड्यांच्या फेऱ्या कमी अथवा बंद केलेल्या आहेत़ या मार्गावरील गाड्या महामंडळाकडून ऑनलाईन बुकिंग प्रणालीवरून काढण्यात आलेल्या असतात. पण, याही गाड्यांचे खासगी कंपन्यांमध्ये सर्रासपणे बुकिंग केले जाते़ यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो़
प्रवाशांकडे ऑनलाईन तिकीट असते. पण, त्या तिकिटावर असलेल्या वेळेत एसटीची फेरी नसल्याने प्रवाशांची अडचण होते. यामुळे आम्ही प्रवाशांना दुसऱ्या गाडीत पाठविण्याची व्यवस्था करतो़
प्रमोद शिंदे, स्थानक प्रमुख