संताजी शिंदे
सोलापूर : एखाद्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला.. तर संपर्कातील नातेवाईक, शेजारी अन् मित्रांचा शोध घेणे म्हणजे एक आव्हानच. हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले ते शहर पोलिसांनी. तीन-साडेतीन महिन्यांत महापालिकेच्या दिमतीला असलेल्या पोलिसांनी रुग्णांच्या संपर्कातील आठ हजार जणांचा शोध घेत त्यांना शासकीय रुग्णालयात आणले. त्यातील ४१२ जण कोरोनाबाधित निघाले. कोरोनाशी दोन हात करताना पोलिसांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही.
च्एखाद्या कोरोनाबाधितामुळे किती जणांना संसर्ग झाला, हे शोधणे, महानगरपालिकेला अवघड जात होते. मात्र शहर पोलिसांनी ही जबाबदारी स्वीकारली, त्यासाठी ३० जणांचे पथक तयार केले. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाकडे चौकशी करीत असताना आपण अडचणीत आलो आहोत, दुसºयाला आणखी कशाला संकटात टाकायचे, हा विचार करून लवकर नावे सांगायला तयार होत नसत.च्विश्वासात घेऊन खोदून खोदून विचारल्यानंतर जी नावं पोलिसांना मिळत होती त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना होते. मिळालेल्या नावाच्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, ‘तिथे आम्ही नव्हतो. मला कसला आजार नाही. मी व्यवस्थित आहे’, असे सांगून तपासणीला येण्यासाठी टाळण्याचा प्रयत्न होतो.
च्एखाद्या घरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास पोलिसांचे पथक संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांच्या पत्त्यावर जाते. पत्ता व्यवस्थित नसतो. शोधताना कसरत करावी लागते. एका व्यक्तीच्या नावाचे तीन ते चार लोक असतात. नेमकी व्यक्ती कशी शोधायची हा प्रश्न पडतो. त्यामुळे सतत वेगवेगळ्या अडचणी पोलिसांना येत असतात.
कोणत्या भागात धोका, हेही यातून कळतं !पोलिसांचे हे पथक दिवसभर कार्यरत असते. आलेल्या माहितीचे विश्लेषण करून अशा भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काळात कोणत्या भागामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे, याचा अहवाल महानगरपालिकेला दिला जातो. कोणत्या भागात, सोसायटीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये कंटेन्मेंट झोन करावा लागेल, याची माहिती त्यात दिली जाते. या मोहिमेत आजवर सुमारे आठ हजार लोकांची माहिती पोलिसांनी पुरवली आहे. - अंकुश शिंदे,पोलीस आयुक्त