सोलापूर : मोहोळ शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोहोळ नगरपरिषदेसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त मोहोळमधील रहिवांशांनी घागरीचं उलटं तोरण बांधून नगरपालिकेचा निषेध केला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. तापमानाचा पाराही ४३ अंशाच्या पुढे गेला आहे. वाढत्या तापमानामुळे उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त असताना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे. नदीला पाणी असूनही नियोजनाअभावी मोहोळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरवसियांना नियमित व मुबलक पाणी मिळत नाही. ऐन उन्हाळया्त पिण्याच्या पाणी मिळत नसल्यानं नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विस्कळीत पाणीपुरवठ्याला अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप रमेश बारसकर यांनी केला. याचवेळी नागरिकांनी नगरपालिकेच्याविरोधात घोषणाबाजी करीत मडकीही फोडली. या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस आंदोलनस्थळावर दाखल झाले होते.