सोलापूर : जनावरांच्या आतड्यांपासून तूपजन्य पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून पोलिसांनी आरोपी अलिम कुरेशी याला अटक केली होती. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कारखान्यामध्ये बनवण्यात आलेले तूपजन्य पदार्थ टॅलो ॲसिड असून याचा वापर टेक्सटाईल कारखान्यामध्ये कापड मऊ करण्यासाठी केले जात होते.
दरम्यान, हे ॲसिड परराज्यात आणि इचलकरंजीमधील कारखान्यांना याचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर येत आहे. दरम्यान, अशा प्रकारचे कुठलेही ॲसिड आपण वापरण्यात येत नाही अशी सोलापुरातील टेक्स्टाईल उद्याेजकांनी दिली. दरम्यान, शनिवारी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचिम, एपीआय दिनेश कुलकर्णी, मल्लिनाथ स्वामी, संतोष माने आदी पथकाने कारखान्यावर जाऊन पंचनामा करत कारखाना पूर्णपणे सील केला. यावेळी तेथील काही सॅम्पल तपासणी लॅबला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या कारखान्यामधील बनवण्यात आलेले तेलजन्य पदार्थ हैदराबाद, आंध्र प्रदेश या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. तसेच रविवारी आरोपी अलिम कुरेशी याला घेऊन पोलीस हैदराबादला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दुसरा आरोपी लवकरच गजाआड
दरम्यान, या कारखान्यासाठी मेलेल्या जनावरांचे मांस हे हैद्राबाद येथून येत होते, अशी माहिती तपासात पुढे येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी इम्रान अब्दुल माजिद कुरेशी अद्यापपर्यंत फरार आहे. त्याच्या मागावर पोलिसांची विशेष टीम पाठविण्यात आली आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उस्मानाबाद आणि सोलापूरच्या आरोपींच्या नावामध्ये साम्य
तीन वर्षांपूर्वी उस्मानाबाद येथील कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणातील आरोपीचे नाव आणि सोलापुरात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या नावामध्ये साम्य असल्यामुळे पोलीस आता उस्मानाबाद प्रकरणाचे धागे दोरे तपासणार आहेत.