सोलापूर : शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा, विशालका कन्सल्टींग सर्व्हिसेसचा संचालक विशाल फटे याचे बार्शीतील घर, कार्यालय, भगवंत पतसंस्थेतील लॉकर्स तपासून झाले आहे. सोमवारी शेवटची पुण्यातील कार्यालयाची तपासणी होणार आहे. दरम्यान पोलीस कोठडीचा शेवटचा एक दिवस शिल्लक राहिला आहे.
शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत महिना ५ ते २५ टक्के रिटर्न्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत, कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून, जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या विशाल फटे याच्या बार्शी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आठ दिवसानंतर तो १७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला होता. बार्शी न्यायालयात हजर केले असता, त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपासामध्ये सध्या विशाल फटे याची गरज नसल्याचे कारण देत पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला बार्शी न्यायालयात उभे केले होते. न्यायाधीशांनी विशाल फटेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसात दि.२७ जानेवारी रोजी पोलिसांनी पुन्हा त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागून घेतली होती. पोलिसांनी आजवर बऱ्याच गोष्टीचा तपास केला आहे, सध्या पुण्यातील कार्यालय राहिले आहे. याची तपासणी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस सोमवारी पुण्याला रवाना होणार आहेत. तेथील तपास करून आल्यानंतर पुन्हा विशाल फटे याला मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी बार्शीच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
रविवारी लेखी तक्रारी अर्ज नाही
- रविवारी दिवसभरात विशाल पटेल याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी एकही तक्रारी अर्ज दाखल झाला नाही. आजवर त्याच्याविरुद्ध सुमारे ११७ ते ११८ अर्ज आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाले आहेत.
- विशाल फटे हा सध्या तपास कामांमध्ये पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याला पुन्हा पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे असे समजते.
- आत्तापर्यंतच्या तपासामध्ये फसवणुकीचा आकडा २४ कोटी ८३ लाख ५६ हजार ५२० रुपयांपर्यंत गेला आहे.