शीतलकुमार कांबळे
सोलापूर : विख्यात अभिनेते गिरीश कर्नाड यांचे सोमवारी निधन झाले. सोलापुरातील ललित कला मंदिरच्या सुशीला वनसाळे, कमलप्रभा हावळे व संजीवनी काळे यांना गिरीश कर्नाड यांच्याबरोबर उंबरठा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या तीन ज्येष्ठ रंगकर्मींनी कर्नाड यांच्याबरोबरच्या आठवणी जागविल्या...खूप मवाळ स्वभावाचे गिरीशजी सर्वांमध्ये पटकन मिसळून जायचे, असे त्यांनी सांगितले.
उंबरठा सिनेमात काम करण्यासाठी दिवंगत रंगकर्मी नामदेव वठारे यांनी ललित कला केंद्रात अभिनय करणाºयांची नावे दिग्दर्शक जब्बार पटेल यांना सुचवली होती. त्यामध्ये सुशीला वनसाळे, कमलप्रभा हावळे व संजीवनी काळे यांचा समावेश होता. त्यामुळे कर्नाड एक अभिनेता आणि माणूस म्हणून या तिघींना अनुभवता आले.
सुशीला वनसाळे म्हणाल्या, मराठी चित्रपट ‘उंबरठा’ हा खूप लोकप्रिय ठरला होता. पुढे हा चित्रपट हिंदीमध्ये ‘सुबह’ या नावाने प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे गिरीश कर्नाड यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात एका हॉटेलमध्ये आम्ही सर्वजण राहत होतो.
यादरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. सेटवर ते एकदम साधेपणानेच वागायचे. तिथे असलेल्या लहान मुलांशीही ते गप्पा मारायचे.
‘उंबरठा’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना सेटवर एक अभिनेता आला होता. त्यावेळी आमच्यासोबत काम करणाºया अनेक मुली त्या अभिनेत्याला भेटायला गेल्या. त्यावेळी मी एकटीच बसल्याचे पाहून गिरीश कर्नाड यांनी माझी विचारपूस केली. माझ्या घरी कोण-कोण असतात हे देखील त्यांनी मला विचारले. त्यांच्याशी बोलताना मला भीती वाटत होती, पण त्यांचा स्वभाव हा खूप मवाळ होता. ते पटकन सर्वांसोबत मिसळायचे, असे कमलप्रभा हावळे यांनी सांगितले.
संजीवनी काळे म्हणाल्या, गिरीश कर्नाड खूप मोठे अभिनेते होते. त्यांच्या वागण्यात मात्र साधेपणाच असायचा. सरळ मनाचे, दर्दी, अभिनय सम्राट असा हा माणूस होता.
‘उंबरठा’ चित्रपटामुळे त्यांच्यासोबत काम करायला मिळाले. त्यांच्यासोबत काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले. ते पटकन सर्वात मिसळायचे़ सिनिअर-ज्युनिअर अभिनेता असा भेद त्यांनी कधीच केला नाही.
..आणि त्यांनी मला सिगारेट आॅफर केली- उंबरठा’ चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना कमलप्रभा हावळे यांनी गिरीश कर्नाड यांच्यासोबत आलेला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, एकेदिवशी गिरीश कर्नाड हे धूम्रपान करण्यासाठी बाहेर आले होते. त्यांच्याजवळ सिगारेट होती, पण माचीस बॉक्स नव्हता. त्यांनी माचीस शोधले पण त्यांना ते मिळाले नाही. माझ्या पर्समधील माचीस मी त्यांना दिले. त्यावेळी त्यांनी मलाही सिगारेट आॅफर केली. मी सिगारेट ओढत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मग माचीस सोबत का ठेवता असे विचारले. त्यावर मी म्हणाले, माझ्याजवळ नेहमी लागणाºया गरजेच्या वस्तू असतात. माझ्याजवळ मेणबत्ती असते म्हणून मी माचीसही ठेवल्याचे त्यांना सांगितले.त्यावर ते हसले आणि म्हणाले, बरं झालं तुम्ही मला सांगितलं. नाहीतर मला वाटलं असतं तुम्ही सिगारेट ओढता तरीही मी तुम्हाला आॅफर केली नाही.
तलेदंड आणि सोलापूर..गिरीश कर्नाड यांनी १९९२ साली ‘तलेदंड’ हे नाटक लिहिले होते. बाराव्या शतकात झालेल्या आंतरजातीय प्रेमविवाहावर आधारित हे नाटक होते. आंतरजातीय प्रेमविवाहामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वर्णन या नाटकात करण्यात आले होते. राजा बिज्जलाच्या पत्नीचे नाव कर्नाटकातील एकाही शिलालेखात आढळले नव्हते. मात्र, हे नाव नान्नज येथील एका ठिकाणच्या शिलालेखात पुरातत्व संशोधक आनंद कुंभार यांना मिळाले होते. याचा कर्नाड यांना खूप आनंद झाला होता.