- सचिन कांबळे
पंढरपूर : कुणी दान धर्म करुन, तर कुणी वारकऱ्यांची सेवा करुन पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रकारे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी कधी पोलीसांच्या तर कधी मंदिर समितीच्या भूमिकेत राहून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सेवा केली आहे.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात जमलेल्या भाविकांना सोयी सुविधा योग्य प्रकारे मिळतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती निर्माण केली होती. यामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा समावेश आहे.
मागील १५ दिवसापासून आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वरील तिन्ही मंत्री जिल्हाधिकारी कुमार अर्शिवाद यांच्याकडून शहरात यात्रेच्या अनुशंगाने आवश्यक असलेली कामे करुन घेत होते. यामध्ये चांगले रस्ते, भाविकांना निवारा, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, दर्शन रांग आदि कामांचा समावेश आहे.
असे असले तरीही ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन भाविकांची गर्दी असलेल्या महाद्वार चौक येथे गेले. त्याठिकाणी भाविकांची चेंगराचेंगरी होऊ नये, भाविकांना रस्त्यावरुन व्यवस्थित ये-जा करता यावे, वॉचटॉवर जिल्हापोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह थांबून भाविकांची गर्दीतून वाट काढण्यासाठी सुचना देत होते.
त्याचबरोबर पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. त्यानंतर जास्ती जास्त भाविकांना विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी गिरीष महाजन स्वत:चा विठ्ठल मूर्तीजवळ थांबून देवाचे पदस्पर्श दर्शन घेणाऱ्या भाविकांना पुढे जाण्यास सांगत होते.