वैराग : बार्शी तालुक्यात वैराग परिसरात एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवून त्यांच्या विवाहित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात वैराग पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे. मंगळवार सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून पीडित विवाहित मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी पीडितेच्या वडिलांची शेती हल्लेखोरांच्या शेजारी आहे. शेजाऱ्यांशी त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. दरम्यान सणामुळे मुलगी ही आई वडिलांकडे माहेरी आली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजता मागील भांडणाचा राग मनात ठेवून गावातील नऊ जणांनी पीडितेच्या आई वडिलांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच घरात घुसून काठ्या, लोखंडी कोयते व दांड्यांनी पीडितेच्या वडिलांना मारहाण करुन उजव्या हातावर, मनगटावर उजव्या पायावर मारून जखमी केले.
यावेळी पीडित विवाहिता व तिची आई भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी विनयभंग केला. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार शिवाजी हळे करीत आहेत.