टेंभुर्णी : पाहुण्याच्या मुलीचे आंघोळ करतानाचे फोटो काढून तिला ब्लॅकमेलिंग करून, तिच्यावर दोन महिन्यांपासून अत्याचार केल्याच्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी आध्यात्मिक शिक्षणासाठी माढा तालुक्यात मे, २०२० मध्ये आली होती. यावेळी पाहुण्याचा मुलगा याने तिने आंघोळ करतानाचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन महिने अत्याचार केला. यानंतर, त्या मुलीला तिच्या गावी पाठविण्यात आले.
काही दिवसांनंतर अत्याचार करणाऱ्या मुलाच्या भावाने पीडित मुलीचा विवाह इंदापूर तालुक्यातील मुलाशी ठरविला. वर मुलगा हा नातेवाईक असून, त्याच्याशीच लग्न करण्याची त्याने जबरदस्ती केली, अन्यथा भावासोबतचे संबंध उघड करण्याची धमकी दिली. घाबरून तिने आईकडे इंदापूर तालुक्यातील मुलाशीच लग्नाचा आग्रह धरला. त्यानुसार, तिचा विवाहही लावून देण्यात आला. मात्र, लग्नानंतर तिचा पती तिला पत्नीप्रमाणे वागवत नव्हता. याचे कारण तिने त्यास विचारले, तेव्हा त्याने अत्याचार करणाऱ्या मुलासोबतचे संबंध कळाल्याचे सांगितले. त्यामुळे पत्नीप्रमाणे वागू शकत नाही सांगत, त्याने मुलीला माहेरी पाठविले. माहेरी आल्यानंतर मुलीच्या आईने खरी हकिकत कळाली. तिने मुलीला बरोबर घेऊन ८ जुलै रोजी भिगवन पोलीस स्टेशन गाठले आणि अत्याचार करणा़ऱ्याविरोधात फिर्याद दिली.
हा प्रकार माढा तालुक्यात टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने भिगवन पोलिसांनी तो गुन्हा टेंभुर्णी पोलीस स्टेशनला वर्ग केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत.