सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या आजी व माजी अशा १३ विद्यार्थिनी दक्षिण सोलापुरातील हाेटगी स्टेशन, फताटेवाडी आणि आहेरवाडतील ४० मुलींना सशक्तीकरणाचे धडे देणार आहेत.
फताटेवाडी येथील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्प (एनटीपीसी) कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून शालेय विद्यार्थिनींसाठी सशक्तीकरण हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ एनटीपीसीला सहकार्य करणार आहे. फताटेवाडी, होटगी स्टेशन आणि आहेरवाडीतील पाचवीच्या ४० विद्यार्थिनींना एक महिना तज्ञ व्यक्तींकडून शिक्षण, क्रीडा, सामान्यज्ञान असे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण निवासी असणार आहे. यामध्ये विद्यापीठाच्या तेरा विद्यार्थिनींनी या शालेय विद्यार्थ्यांनीना मॉनिटरिंग करणार आहेत. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे इंटर्नशिपही पूर्ण होणार आहे. तसेच एनटीपीसी त्यांना मानधन देणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.
सुटीचा होणार सदुपयोग
पाचवीच्या शाळांना आता सुटी लागली आहे. त्यामुळे तीन गावांत पाचवीत शिकणाऱ्या मुलींची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. ४ मे ते ४ जून या कालावधीत हे प्रशिक्षण चालणार आहे. प्रशिक्षणाचा सर्व खर्च राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्प करणार आहे.