सोलापूर : संस्थेत इमाने इतबारे नोकरी करीत असताना त्या संस्थेविषयी आपुलकी बाळगणारे खूप कमी लोक आहेत. मुलीच्या आयटीआय महाविद्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतही अंधार पसरला. संस्थेचे आपण काही देणं लागतो, ही भावना उराशी बाळगून तेथील शिपाई श्रावण विठ्ठल कोकणे हे माणुसकीच्या भावनेतून धावून आले अन् त्यांनी १ लाख ८६ हजार रुपयांचे बिल अदा करीत संस्थेवरची निष्ठ दाखवून दिली. संंस्थेनेही त्यांच्या खात्यावर पैसे जमा करून कोकणे यांचे आभार मानले.
सोलापुरातील मुलींच्या आयटीआय या संस्थेची जवळपास चार लाख रुपये वीजबिल थकीत होते. ही थकीत रक्कम न भरल्यास वीज कापण्यात येईल अशी नोटीस वीज महामंडळाकडून आयटीआयला देण्यात आली होती. पण, शासनाचे अनुदान न आल्यामुळे आयटीआय संस्थेची वीजबिल भरण्यात आलेली नव्हती. यामुळे महामंडळाकडून कारवाई करत आयटीआयची वीज कापण्यात आली. त्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्येही वीज नसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांचे हाल होऊ लागले. ही माहिती जेव्हा श्रावण कोकणे यांना कळाले तेव्हा त्यांनी स्वतःहूनच आयटीआयचे प्राचार्य सुरेंद्र शिंदे यांची भेट घेत आपण वीजबिल भरण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी १ लाख ८६ हजार रुपयांचे वीजबिल भरले. दरम्यान, संस्थेत कार्यरत असणाऱ्या अनेक प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी अर्धे वीजबिल भरण्याविषयी चर्चा करत होते. पण कोकणे यांनी पूर्ण रक्कम आपण एकटे भरण्यास तयार आहोत असे सांगितले. वीज आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी कोकणे यांचे आभार मानले.
होमगार्ड म्हणून पाच जणांना जीवदानही दिले
कोकणे हे मागील तीस वर्षांपासून मुलींचे आयटीआयमध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहे. सोबतच ते होमगार्डही होते. २६ वर्षे होमगार्डची सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले आहेत. ते सोलापूर आयटीआयमध्ये जवळपास तीस वर्षांपासून सेवा बजावून पुढील महिन्यांमध्ये निवृत्त होणार आहे. होमगार्ड म्हणून सेवा बजावत असताना त्यांनी २००२च्या दंगलीमध्ये काही समाजकंटकांनी पेंटर चौकातील हॉस्पिटलला आग लावली होती. या आगीत पळणाऱ्या चार ते पाच जणांना त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविले होते. याबद्दल त्यांना तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित केले होते.
मी कामावरून घरी जात असताना शेजारी असलेल्या कॉटर्समध्ये गेलो. त्यावेळी आमच्या एका सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना कॅन्सरची लागण झालेली होती. वीज नसल्यामुळे त्यांचे हाल सुरू होते. ही स्थिती मला पाहवली नाही. त्यातच आपण गेल्या तीस वर्षांपासून संस्थेमुळे आपले कुटुंब चालते आपण संस्थेचे ऋण फेडावे या उद्देशाने मी वीजबिल भरण्याचा निर्णय घेतला. वीजबिलासाठी भरलेली रक्कम मला नुकतीच बँक खात्यात जमा झालेली आहे.
- श्रावण विठ्ठल कोकणे, लाइट बिल भरणारे
मागील अनेक वर्षांपासून श्रावण कोकणे हे आयटीआयमध्ये सेवेस आहेत. वीज कापण्याची माहिती होतास त्यांनी स्वतःहून जाऊन वीज भरण्यास तयार असल्याचे सांगितले. यामुळे त्यांची संस्थेबद्दलचे आत्मियता दिसून येते.
पी. बी. परबत, माजी उपप्राचार्य