रवींद्र देशमुख
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी माढा दौऱ्यावर येत आहेत. मराठा आरक्षण द्या मगच दौरे करा असे म्हणत अजित पवार यांच्या दौऱ्याला माढा सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध दर्शविण्यात आलेला आहे. याबाबत माढा पोलिसांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील आमदार बबनराव शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी खा. शरद पवारही माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावून मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार व अजित पवार दोघेही एकाच दिवशी माढा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने राजकारणात मोठी चर्चा आहे.
त्यातच गुरुवारी माढा सकल मराठा समाजाच्या वतीने माढा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. त्या निवेदनात म्हटले की, मराठा आरक्षण द्या मगच दौरे करा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील कार्यक्रमास प्रवेश बंदी करण्यात येत आहे. तसे न झाल्यास मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे असेही त्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर आणखीन ताण वाढला आहे.