सोलापूर : शैक्षणिक ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे, यासाठी जुळे सोलापुरातील वि.मो. मेहता शाळेत भाजी मंडई भरविली जाते. नफा-तोटासारखे विषय अभ्यासक्रमात असतात, हेच विषय जर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकल्यास विद्यार्थ्यांना लवकर कळतात, हा यामागचा उद्देश आहे.
सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोगशील उपक्रम शाळेत घेतला जातो. विद्यार्थ्यांना शाळेकडून भाजी पुरविली जाते. भाजी मंडई सुरु केल्यानंतर पालक तसेच शाळेच्या परिसरातील नागरिकांनादेखील मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी बोलावण्यात येते. भाजीची विक्री करताना विद्यार्थी हे तिथे आलेल्या ग्राहकांना त्या भाजीमधून मिळणाºया जीवनसत्वाची माहिती देतात. कोणत्या भाजी व फळाचे सेवन केल्यास कोणत्या आजारास दूर ठेवता येते याबद्दल विद्यार्थी माहिती सांगतात. प्लास्टिक पिशव्यापासून पर्यावरणास निर्माण होणारा धोका याबाबत ग्राहकांना पटवून दिले जाते तसेच कापडी पिशव्या आणणे, ताजे अन्न खाण्याचे फायदे याबद्दल माहिती दिली जाते.
आषाढी एकादशीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो़ श्रावण महिन्याचे स्वागत म्हणून प्रशालेत ‘हरित दिन’ साजरा करतात. प्रशालेत आणि आसपासच्या परिसरात वृक्षारोपण केले जाते. टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, पुस्तक परिचय, कविता तयार करणे, पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विविध माहिती गोळा करणे, मेहंदी स्पर्धा यासारख्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. वादविवाद स्पर्धा आयोजित केली जाते .पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा दरवर्षी आयोजित केली जाते.
प्रशालेचा गणपतीही पर्यावरणपूरकच असतो, त्याचे विसर्जनही प्रशालेत केले जाते. यासोबतच पावसाळ्यानिमित्त गिरीभ्रमंती सहल आयोजित केली जाते .दिवाळीनिमित्त कागदी आकाशदिवे विद्यार्थी तयार करतात. नवनवे प्रयोगशील उपक्रम करण्यासाठी शाळा नियामक मंडळाचे सदस्य अॅड. दामोदर भंडारी, प्रा. पी.पी. कुलकर्णी, पर्यवेक्षिका सुष्मिता तडकासे यांचे मार्गदर्शन असते.
विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा ध्यास हे ब्रीद मनाशी बाळगून विद्यार्थ्यांना शिकविले जाते. प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांची उत्तम साथ असल्यामुळेच शाळेची प्रगती होत आहे. उत्कृष्ट नियोजन कौशल्य,अचूक निर्णय क्षमता व सुयोग्य मार्गदर्शन करणारे शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांची मोलाची साथ लाभत आहे. -श्रुती बागेवाडी, मुख्याध्यापिका, वि. मो. मेहता प्रशाला, जुळे सोलापूर.