करमाळा तालुक्यातील मांगी गाव हे करमाळा शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. या तलावाचे भूमिपूजन आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते झाले. त्यावेळी या भूमिपूजनाला दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आदी उपस्थित होते १९५५ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले. ब्रिटिशकालीन पाझर तलाव म्हणून मांगी तलाव प्रसिद्ध आहे. पूर्वी मांगी तलाव परिसरात सुंदर बाग होती. यामध्ये निरनिराळी फुले, फळे, जांभूळ, बाभळी खूप प्रसिद्ध होती. मांगी तलावात पुरेसा पाणीसाठा असल्याने ही बाग सदैव हिरवीगार व सुंदर दिसत होती. निसर्गरम्य वातावरणात ही बाग नेहमी पर्यटकांनी सजलेली असायची.
करमाळा तालुक्यासह सोलापूर, मुंबई, पुणे येथून पर्यटक सुटीच्यादिवशी मांगी तलाव व बागेत फिरायला येत असत. खूपच सुंदर सौंदर्य या मांगी तलाव परिसरात पाहायला मिळायचे. सध्या मांगी तलाव निसर्गकृपेने पूर्ण क्षमतेने भरला आहे. यात सध्या विविध प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात आले आहेत. पाणी असल्याने बोटिंग व्यवसाय चालणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. सध्या मांगी तळ्यात अनेकप्रकारचे पक्षी येत आहेत. पाटबंधारे विभाग तसेच आ. संजयमामा शिंदे, मांगी येथील सुजित बागल यांनी मांगी तलाव पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास मदत करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो...०४करमाळा-मांगी