सोलापूर : माळशिरस तालुक्यातून भाजपला एक लाखाचं मताधिक्य मिळवून दिलंय. लाखाचा लीड दिला तर राजकारणातून संन्यास घेऊ, असे कुणीतरी म्हणाले होते. ही माणसे आता राजकीय संन्यास घेणार का? भगवी वस्त्रं आणून देऊ का, असा टोला शिवरत्न दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना लगावला.
माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचारावेळी जयसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य देऊ, असे जाहीर केले होते. माळशिरसमधून लाखाचा लीड मिळाला तर राजकीय संन्यास घेऊ, असे संजय शिंदे यांनी म्हटले होते. माळशिरसमधून निंबाळकरांना लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे.
मतमोजणी केंद्रात गुरुवारी धैर्यशील मोहिते-पाटील सहा विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी संकलित करीत होते. यादरम्यान ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, अकलूज, यशवंत नगर भागातील लोक यावेळी ऐकायला तयार नव्हते. आपल्या गटावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनाही होती. त्यामुळे तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. प्रचारादरम्यान लोकांचा कल लक्षात आला होता. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे तर माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमधून निंबाळकरांना २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य आहे. आता त्यांनी राजकीय संन्यास घ्यायला हवा. भगवी वस्त्रं आणून देऊ का?, असा सवालही त्यांनी केला.
सगळेच पत्ते ओपन करणार नाही - धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, फलटण, माण, माळशिरस तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळेल याचा अंदाज होताच. करमाळा तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर मी लक्ष ठेवून होतो. विरोधी गटातील नाराज नेत्यांना आम्ही विश्वासात घेतले. त्यांनी आमच्या बाजूने आले नाही तरी चालेल, पण किमान शांत राहावे, अशी गळ घातली. खरोखरच ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांनी आम्हाला साथ दिली. सगळेच पत्ते आता ओपन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. माढा आणि सांगोल्यातील मतदानाची आकडेवारी तुमच्यासमोर आहे. या तालुक्यांनी विरोधी गटाला विशेष मताधिक्य दिलेले नाही.