सोलापूर: अवयवदान मोहिमेत अग्रेसर ठरलेल्या सोलापुरात आज (बुधवारी) पुन्हा सातव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम राबवण्यात यश मिळाले. येथील यशोधरा रुग्णालयात मेंदू मृत झालेल्या सतीश नामदेव पलगंटी यांची दोन मूत्रपिंडे (किडनी) आणि यकृत (लिव्हर) अशा तीन अवयवांचे दान करण्यात आले. पलगंटी परिवाराने आपला दु:खावेग बाजूला सारून कर्तव्य भावना दाखवली. विशेष म्हणजे दोन्ही मूत्रपिंडे पंढरपूर तालुक्यातील दहा वर्षांपासून डायलेसिसवर असलेल्या दोघा सख्ख्या बहिणींना मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे.
यशोधरा रुग्णालयात झालेल्या या अवयवदानामुळे या क्षेत्रात २०१८ मध्ये सोलापूरचा पुणे क्षेत्रात दुसरा क्रमांक आला आहे. सतीश पलगंटी यांच्या मूत्रपिंडासोबतच यकृतही दान करण्यात आले असून, ते सोलापूर-पुणे ग्रीन कॉरिडॉर निर्माण करुन पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात नेऊन तेथील गरजू रुग्णाला बसवण्यात आले.
सतीश पलगंटी हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होते. चार वर्षांपासून ते रक्तदाबाच्या विकाराने आजारी होते. ११ मार्च रोजी त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने मार्कंडेय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे सीटी स्कॅन काढला असता मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले होते. तिथे त्यांचा सीटी स्कॅन काढला असता मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे १३ मार्च रोजी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलने कायदेशीर चाचण्या केल्यानंतर त्यांना ब्रेनडेड म्हणून घोषित करण्यात आले.
यशोधरा रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉॅ. श्रीनिवास येमूल हे सतीश पलगंटी यांचे नातलग आहेत. त्यांनी पलगंटी यांच्या नातलगांना अवयवदानाबद्दल माहिती दिली. पलगंटी यांच्या पत्नी कल्पना व बंधू राजेश यांनी या दु:खावेगाच्या अवस्थेतही सामाजिक भान राखत अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. अशारितीने प्राप्त होणारे अवयव कोणत्या रुग्णाला द्यावेत, याचा निर्णय शासकीय कमिटीकडून घेतला जातो. त्यामुळे पलगंटी यांच्या अवयवदानाची माहिती या कमिटीला कळवण्यात आली. अवयव हवे असणाºया रुग्णांच्या प्रतीक्षायादीत यशोधरा रुग्णालयातील दोन सख्ख्या बहिणींची नावे वरच्या क्रमांकावर होती. म्हणजे सोलापुरात प्राप्त झालेली पलगंटी यांची मूत्रपिंडे पंढरपूर तालुक्यातील या सख्ख्या बहिणींना मिळाली आणि यकृत पुण्यातील रुग्णास देण्यात आले.
या प्रक्रियेमध्ये डॉ. विजय शिवपुजे आणि रुबी हॉस्पिटलचे डॉ. कमलेश बोकील यांनी केली. यावेळी प्राप्त झालेली मूत्रपिंडे दोन्ही रुग्णांवर एकाचवेळी प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रिया चेअरमन डॉ. बसवराज कोलूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. विजय शिवपुजे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. शेहरोज बॉम्बेवाला, डॉ. मंजिरी देशपांडे, डॉ. राहुल स्वामी या चमूंनी केली. याशिवाय या उपक्रमात डॉ. सचिन बलदवा, डॉ. आशिष भुतडा, डॉ. मुक्तेश्वर शेटे, डॉ. पौर्णिमा सालक्की, डॉ. संदीप लांडगे तर अवयवदानाच्या प्रशासकीय पूर्ततेसाठी प्रशासकीय अधिकारी विजय चंद्रा, उल्हास शिंदे, सूर्यकांत बेळे, परेश मनलोर, शरण मलखेडकर, धनंजय मुळे, दत्तात्रय होसमाने, संपत हलकट्टी, हनुमंत मेडशंगे व शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख पांडुरंग माळी व त्यांच्या सहकाºयांनी परिश्रम घेतले.
सख्ख्या बहिणी सख्ख्या जावाच्पलगंटी यांच्या अवयवदानामुळे जीवदान मिळालेल्या ज्या सख्ख्या बहिणींना दोन मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले त्या सख्ख्या बहिणींबरोबरच सख्ख्या जावाही आहेत. गेल्या दहा वर्षापासून त्या मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असल्याने डायलेसिसवर होत्या. दोघींनाही योगायोगाने एकाचवेळी एकेक मूत्रपिंड मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. सोलापूरच्या रुग्णांच्या अवयवाचे सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांंना लाभ झाला, हाही योगायोग म्हणावा लागेल.