सोलापूर : भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या सात जनावरांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून सुटका करण्यात आली. ही कारवाई जुना विडी घरकूल येथील बागवान नगरात करण्यात आली. जुना विडी घरकुल येथील बागवान नगर येथे काही गोवंश तस्करी चोरांनी तब्बल ७ जनावरांना भुलीचे औषध पाजवले. तेथील कुत्रे भुंकू नये यासाठी त्यांना बिस्किटाच्या माध्यमातून बेशुद्ध पडण्याचे औषध देण्यात आले. काही लोकांनी भुल पडलेल्या जनावरांना अलिशान कारगाडीत भरण्यात सुरुवात केली.
काही वेळातच तेथील रहिवाशांना काहीतरी चुकीचा प्रकार होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते पवनकुमार कोमटी व सतीश सिरसिल्ला यांच्याशी संपर्क साधला. काही क्षणातच बजरंग दलातील बजरंगी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना चाहूल लागताच ते जनावरे जागेवर सोडून कार मध्ये बसून पळून गेले. सर्व जनावरांना सुखरूपपणे बार्शी रोड येथील अहिंसा गोशाळेत सोडण्यात आले. एमआयडीसी पोलिस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी या कारवाईला सहकार्य केले. ही कारवाई बजरंग दल गोरक्षा विभाग जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी, पवनकुमार कोमटी, सतीश सिरसिल्ला, पवन बल्ला, धनंजय बोकडे व इतर कार्यकर्त्यांनी पार पाडली.