सोलापूर : विजापूर वेस ते दिलदार मशीद हा मार्ग विद्युत दिव्यांनी झगमगणार असून, मानाच्या सातही नंदीध्वजांवर पुष्पवृष्टी करीत एकात्मतेचा संदेश देणार असल्याचे एम. एस. फाउंडेशनचे संस्थापक मुक्री सालार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि वैष्णवी करगुळे याही आपल्या भागातील रस्ते प्रकाशमय करण्याचा विडा यंदाही उचलला आहे.
श्रीदेवी फुलारे या डफरीन चौक ते महापौर बंगल्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई आणि स्वागत फलक लावणार आहेत. वैष्णवी करगुळे यांनी पुढचा मार्ग म्हणजे महापौर बंगला ते माळगे फोटो स्टुडिओचा मार्ग प्रकाशमय करण्याचा निर्णय घेताना भक्तगणांचे स्वागत फलकही उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भैया चौक ते सुपर मार्केटपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रंगीबेरंगी एलईडी दिवे लावणार असल्याचे नगरसेवक विनोद भोसले यांनी सांगितले. शहरातील अन्य संघटना, विविध बँका, व्यापाºयांनी दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन करण्यात आले.
चहा विक्रेत्याचेही योगदान- रेल्वे स्टेशन परिसरातील चहा विक्रेते कपिल नाडगौडा यांनी रेल्वे स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याभोवती एलईडी दिव्यांची रोषणाई करणार असल्याचे सांगितले. पुतळ्याच्या आतील भागात नंदीध्वजांची प्रतिकृती ठेवून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर फोकस सोडण्याचेही त्यांनी नमूद केले. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणाºया परप्रांतीय प्रवाशांना यात्रेचे महत्त्व कळावे म्हणून आपला छोटासा प्रयत्न राहणार असल्याचे कपिल नाडगौडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कसबा गणपती मंदिरही झळाळणार-सोमनाथ भोगडे- बाळीवेस येथील मानाचा श्रीमंत कसबा गणपती मंदिरावर विद्युत रोषणाई करुन परिसर प्रकाशमय करणार असल्याचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे यांनी खास बैठक घेऊन सांगितले. बाळीवेस परिसरातील व्यापाºयांनी, भक्तगणांनी विद्युत रोषणाई करण्याबरोबरच दीपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही भोगडे यांनी केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नंदकुमार मुस्तारे, मल्लिनाथ मसरे, अॅड. मिलिंद थोबडे, केदार मेंगाणे, मल्लिनाथ खुने, रामचंद्र जोशी, बिपीन धुम्मा आदी उपस्थित होते.
सोलापूर नगरी ही कष्टकºयांची, कामगारांची नगरी आहे. इथे सर्वच जाती-धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदतात. इथली एकात्मता अधिक दृढ व्हावी यासाठी यात्रेत आपण सहभाग नोंदवला आहे. विजापूर वेस ते दिलदार मशीद या मार्गावर विद्युत रोषणाई आणि नंदीध्वजांवर पुष्पवृष्टी करणार आहे.- मुक्री सालार,संस्थापक- एम. एस. फाउंडेशन.
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला. त्या संदेशाची प्रचिती श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत दिसून येते. संपूर्ण शहरवासीयांची ही यात्रा असते. ती अधिक प्रकाशमय होण्यासाठी मी डफरीन चौक ते महापौर बंगला या रस्त्याच्या दुतर्फा विद्युत माळा सोडणार आहे. - श्रीदेवी फुलारे, नगरसेविका.
गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रा यशस्वी झाली. सर्वच जाती-धर्मातील घटक सहभागी झाले पाहिजेत. स्वत:पासून सुरुवात म्हणून मी गेल्या वर्षीही विद्युत रोषणाई केली होती. यंदाही महापौर बंगला ते माळगे फोटो स्टुडिओपर्यंतच्या मार्गावर विद्युत माळा सोडून परिसर लख-लख करणार आहे.- वैष्णवी करगुळे, नगरसेविका.
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराबरोबर सोलापूरचे ब्रॅण्डिंग होण्यासाठी ‘लोकमत’ने चांगले पाऊल उचलले आहे. प्रकाशमय यात्रा आणि दीपोत्सव-२०२० च्या माध्यमातून सर्वांनी पुढे आले पाहिजे. भैय्य चौक ते सुपर मार्केटपर्यंतचा मार्ग मी विद्युत दिव्यांनी लख-लख करणार आहे.- विनोद भोसले, नगरसेवक.