अंगणवाडी सेविका या गरोदर माता, स्तनदा माता आणि ० ते ६ वर्षे वयाच्या बालकांना विविध सेवा पुरवतात. त्यांना नियमित पोषक आहार पुरवठा करणे, जन्म-मृत्यूच्या नोंदी करणे, लसीकरण करवून घेणे अशी कामे करत असतात. कोरोनाच्या काळात पहिल्या लाटेत अंगणवाडी सेविकांनी आरोग्य विभागाच्या बरोबरीने काम केले. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आणि त्यामुळे गरोदर माता, स्तनदा माता आणि मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
तिसऱ्या लाटेत बालकांच्या जीवालाही कोरोनाचा धोका निर्माण होईल, हे लक्षात घेऊन महिला व बालकल्याण विभागाच्या पुणे आयुक्तांनी लेखी आदेश काढून कोरोनाच्या कामात अंगणवाडी सेविकांना सामावून घेऊ नये, असे आदेश काढले आहेत.
अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या नेहमीच्या कामावर लक्ष केंद्रित करून माता आणि बालकांच्या आरोग्यविषयक सुविधांना प्राधान्य द्यावे, असे आदेश दिले आहेत.
अंगणवाडी सेविकांसाठी जोखमीचे काम
सोलापूर जिल्ह्यात बहुतेक सर्व तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणी होत असताना वाखरी ग्रामपंचायतीने मात्र सर्व सेविकांना दररोज ५० घरांचा सर्व्हे करावा असा फतवा काढला आहे. वाखरीत आजवर तब्बल ७७० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत आणि ३० पेक्षा अधिक रुग्ण मयत झाले आहेत. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असताना आरोग्य सेविकांना या जोखमीच्या कामात ढकलले जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अंगणवाडी सेविकांनी पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभागाला हाय रिस्क, लो रिस्क लोकांची माहिती घरोघरी जाऊन गोळा करून दिली आहे. तरीही आता सरसकट सर्वच घरी जाऊन सर्व्हे करण्याचा काढलेला फतवा अंगणवाडी सेविकांसह माता आणि बालकांसाठी जोखमीचे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोट ::::::::::::::::::
याबाबत अद्याप आपल्याकडे माहिती नाही. मात्र स्थानिक ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याकडून आवश्यक माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
- रविकिरण घोडके
गटविकास अधिकारी, पंढरपूर