नुकतेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले त्यामुळे साहजिकच शेवटी का होईना विद्यार्थी खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी मोबाईल व टीव्हीमधून थोडे डोके वर काढायला सुरुवात केलीय. प्रत्येकाला हवं हवंसं वाटणारं , प्रत्येकाचं हृदय हेलावून सोडणारं, प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारं हे विद्यार्थी जीवन असतं. याच विद्यार्थी जीवनात काही घटना कळत नकळत घडून जातात अन् त्या आठवणी मनात घर करून बसतात. त्या आठवल्या की मन मात्र वाºयासारखं भूतकाळाकडं ओढ घेतं. त्यावेळी मात्र मनाच्या झोपाळ्यावर विचाराचे हिंदोळे चालू असतात, विद्यार्थीदशेत योग्य वेळ असते ती काहीतरी बनण्याची, करण्याची, इथूनच पुढच्या आयुष्याला दिशा मिळते. जीवनाला आकार प्राप्त होणार असतो.
आज प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी व्हावं, लोकांनी आपल्याकडे काहीतरी म्हणून पाहण्यापेक्षा विशेष काहीतरी म्हणून पाहावं व प्रत्येक जण हा उद्याच्या आशेवर जीवन जगत असतो. कारण प्रत्येकाचे जीवन म्हणजे ‘एक भिजलेल्या कागदा सारखे’ असते समोरचं दिसत नसते अन् मागचं पहावत नसतं म्हणून तर उद्याच्या आशेवर जीवन जगून पाहायचं असतं. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आशा-आकांक्षा निर्माण होतात आणि त्या पूर्ण हव्यात अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. प्रत्येक मनुष्य जन्मताच आशा-आकांशा घेऊन येतो असं नाही. बालवयात फारशा कुणाच्याही मनात आशा निर्माण होत नाही.
पालक मुलांना शाळेत घालतात, का तर ते घालतात म्हणून जायचे. ज्या वयात भरपूर खेळायचं बागडायचं त्या वयात अभ्यासाचा भार विद्यार्थ्यांना सहन होत नाही. मुलं पुढे हायस्कूलला येतात ते वेगळे विषय, वेगळे शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात महत्त्वाकांक्षेला आकार मिळायला सुरुवात होते. त्याचवेळी स्वप्न पण रंगवायला सुरुवात होते. त्याचवेळी घरातील मंडळी तुला अमूक व्हायचंय! तुला तमूक व्हायचंय ! असं म्हणतात म्हणजे काहीतरी हो ही त्यांची धारणा असते; पण आज जर एका सामान्य विद्यार्थ्याला प्रश्न विचारला की तुला पुढे होऊन काय व्हायचंय तर त्याने सहज सांगितले की मला पंतप्रधान व्हायचंय ! खूप मोठे ध्येय छान पण जर पुढे पंतप्रधान होऊन तू काय करणार आहेस ? असा प्रश्न विचारल्यास पुढे बटाट्याचं दुकान टाकणार आहे, असं उत्तर मिळाले तर सगळ्यांना त्याच्या बुद्धीचे नवलच वाटेल.
मुलांना पालकांनी लादलेल्या अपेक्षा अजिबात आवडत नाहीत. स्वामी विवेकानंद व त्यांच्या वडिलांचा संवाद सुरु असताना त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न केला की मी काय होऊ? त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या त्यांच्या सारथी असलेल्या फोटोकडे हात करून सांगितले. ‘तू काही हो वेळप्रसंगी असे हो पण, संपूर्ण देशात तुझं नाव व्हायला पाहिजे.’ त्या वेळेस त्यांनी दुसरा प्रश्न केला की ‘तुम्ही मला काय दिलेत’ यावर त्याचे वडील त्यांना आरशाकडे घेऊन गेले आणि सांगितले हा मानवी देह मी तुला दिला आहे, तुला काय व्हायचे तू ठरव. याचा पण प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करावा. अवाढव्य अपेक्षामुळं मुलं अपयशी होतात. आपल्या मनातील महत्त्वाकांक्षेला दाबून ठेवतात. पालकांच्याअपेक्षा पोटी मुलाला आपल्या अपेक्षा महत्त्वाकांक्षा बदलाव्या लागतात.
महत्त्वाकांक्षेशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही हे पण तितकेच सत्य आहे. त्यासाठी आत्मविश्वासाची साथ पाहिजे. कारण महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेथे एक हजर असतो तर दुसरा अगोदरच हजर असतो. आपल्या ध्येयावर प्रगाढ विश्वास आणि ती प्राप्त करण्याची प्रखर इच्छा असेल तर सारं काही साध्य होतं. प्रत्येक मनुष्य आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. त्यावेळी आपण कुठलेही काम करताना अडचणी येत असतात म्हणून नाराज होऊन त्यापासून पळू नका, दु:खी होऊ नका. कारण जीवन हे कबड्डी सारखं असतं.
अंगात जोपर्यंत दम आहे, तोपर्यंत योग्य ते कौशल्य वापरून गडी बाद करायचा असतो, उगीचच कबड्डी कबड्डी म्हणून आरडाओरडा करून काही निष्पन्न होत नाही. जीवनात सुख-दु:ख ही येतच असतात पण सुखाने मोहून जाऊ नका,दु:खाने खचून जाऊ नका. आपल्या पाठीशी अनुभवाची शिदोरी घेऊन चला कारण अनुभव हाच खरा शिक्षक असतो तो स्वत: परीक्षा घेत असतो आणि मगच शिकवत असतो. तुम्ही काही का होईना ध्येय नक्कीच बाळगा मग ते कोणतेही असो. नक्कीच यशस्वी व्हाल !- हेमंत निंबर्गी(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत)