शीतलकुमार कांबळे, सोलापूर: वृद्ध कलावंताच्या मानधनात वाढ करावी, वृद्ध कलाकार मानधन समिती गठित करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध कलावंतांनी आंदोलन केले. कलावंतानी देव, राक्षसांची वेशभूषा करत निदर्शने केली. वृद्ध कलावंतांना किमान पाच हजार मानधन मिळावे, केंद्र शासनाप्रमाणे समान मानधन द्यावे, दरवर्षी लोककलावंतांची परिषद घ्यावी, २०२० पासून प्रलंबित प्रकरणे मंजूर करावे, अशा मागण्या शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा कलावंत संघटनेच्या वतीने मांडण्यात आल्या. अनोख्या पद्धतीने आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये वृद्ध कलावंत समितीची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे नव्याने वृद्ध कलावंत म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य निवडीचा अधिकार हा पालकमंत्री यांना असतो. या समितीत फक्त कलाकारांचीच निवड केली जाते. २०२२ रोजी निवडलेल्या समितीचे तीन वर्षे पूर्ण झाले. तेव्हापासून ही समिती स्थापन केलेली नाही, असे कलाकारांनी सांगितले.
सांगोल्यातून वाघ्या मुरळी तर मंगळवेढ्यातून आले पोतराज
आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर व जिल्ह्यातून अनेक कलावंतांनी हजेरी लावली. सोलापूर शहरातील दहा बहुरूपी आले होते. तसेच जागरण गोंधळ करणारे 15 कलाकार, पाच शाहीर, भजनी मंडळ, विविध वाद्य वाजवणारे कलाकार असे सुमारे 300 कलावंतांनी आंदोलनात सहभाग घेतला. या सर्वांमध्ये बकासुरची वेशभूषा घेतलेल्या कलाकाराने सर्वांचे लक्ष वेधले. यासोबतच सांगोलातून वाघ्या मुरळी तर मंगळवेढा तालुक्यातून पोतराजही आले होते.