मतदारांनी त्यांना या निवडणुकीत साफ नाकारल्याचे चित्र आहे. पंढरपूर पोटनिवडणूक व मागील विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. मात्र मागील वेळी सेना-भाजपमुळे ही जागा रयतक्रांतीला सुटली. त्यामुळे त्यांना पक्षादेश मानत माघार घ्यावी लागली. तर यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याने पक्षाकडून त्यांना उमेदवारी घेता आली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविली. याअगोदर गेल्या काही महिन्यांपासून विविध आंदोलने, मोंर्चे, पाणीप्रश्न, घरोघरी भेट देत त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली. याच जोरावर त्यांना चांगली मते मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र या निवडणुकीत केवळ १६०७ मते मिळाल्याने मोठी नामुष्की पत्करावी लागली.
स्वाभिमानीकडून राज्य सरकार शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देत नाहीत. थकीत वीजबिलापोटी वीज कनेक्शन कट करत आहे, अशा विविध मागण्या समोर आणत आघाडी धर्माचे पालन न करता शेवटच्या टप्प्यात निवडणुकीत अर्ज दाखल करत तो शेवटपर्यंत काढला नाही. प्रचारादरम्यान राजू शेट्टींनी स्वत: तळ ठोकून प्रचार केला. दोन्ही प्रमुख साखर कारखानदार उमेदवारांसह राज्य सरकारवर आगपाखड केली. त्यामुळे त्यांनाही शेतकऱ्यांची मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात असताना केवळ १०२७ मते मिळाली. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून जनमानसात संघटनेच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचे मानले जात आहे.
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी घरातील व त्यांच्या काही सहकारी संस्थांमधील मतभेद ऐन निवडणुकीत चव्हाट्यावर आणत भावबंदकी साधण्याचा प्रयत्न केला. सिद्धेश्वर आवताडे हे समाधान आवताडेंसाठी मोठी डोकेदुखी ठरतील, अशी अपेक्षा प्रारंभी व्यक्त केली जात होती. मात्र निवडणुकीत त्यांना मिळालेली २९५५ ही मते त्यांच्या मर्यादा स्पष्ट करणारी ठरली आहेत. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी मोठा आटापिटा, गाजावाजा करून निवडणूक रिंगणात उड्या घेतल्या. मात्र निवडणुकीत त्यांचा कोणताही करिश्मा चालला नसल्याचे चित्र आहे. मतदारांनी त्यांना साफ नाकारले असून भविष्यात निवडणुका लढविताना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.