लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : भाजपची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणात बसत नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम असून भाजपबरोबर जाणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला येथे पत्रकार परिषदेत मांडले.
अजित माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर मी आता कुटुंबात वडीलधारी आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी त्यांना भेटलो. या भेटीने माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, अशी भूमिका मांडून अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त बैठकीच्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकला.
भाजपबरोबर युती करण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले की, भाजपबरोबर युती करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक मोठ्या प्रमाणात माघारी येऊ इच्छितात. काही लोक म्हणतात की, आमच्याकडून जे झाले ते चुकीचे झाले. २०२४ पर्यंत काही बदल होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
ईडीला उत्तर देण्यास समर्थ
ईडी नोटिसीसंदर्भात पवार म्हणाले की, आजची राजकीय परिस्थिती विचित्र झालेली आहे. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सत्ताधारी ईडी, सीबीआय यांच्या नोटीस पाठवत आहेत. अशा नोटिसांना तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत.
राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही : जयंत पाटील
पंढरपूर : राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नाही. सर्व ठिकाणी शरद पवारांचे फोटो असतात. सगळे पवार यांचेच नेतृत्व मान्य करतात, असे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगोला येथे स्पष्ट केले. ते म्हणाले की, माझ्या भावाला ईडीची नोटीस आली हे खरे आहे. परंतु, त्याचा व कालच्या पुणे येथील भेटीचा काही संबंध नाही. कोण कोणाला कधीही कुठेही भेटू शकतो.